Locked down flights of Sai Institute also; One crore donation of devotees | लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी

लॉकडाऊनमध्येही साई संस्थानची कोटीची उड्डाणे; भाविकांची एक कोटींची देणगी

प्रमोद आहेर/
शिर्डी : महाराष्ट्र व संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी साईभक्तांच्या श्रद्धेचा आलेख मात्र खाली आलेला नाही. साईमंदिर बंद असूनही भाविकांकडून बाबांना देणग्यांचा ओघ सुरू आहे.गेल्या अठरा दिवसात साईसंस्थानला आॅनललाईनच्या माध्यमातून तब्बल एक कोटींपेक्षा अधिक दान प्राप्त झाले आहे.
    कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजेनंतर साईमंदिर भाविकांना व ग्रामस्थांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिरात भाविकाविणा पूजा-अर्चा होत आहेत. १७ मार्च ते ३ एप्रिल या मंदिर बंदच्या काळात जगभरात विखुरलेल्या भाविकांनी साईबाबांना आॅनलाईनद्वारे १ कोटी २ लाख ३७ हजार रुपये दान पाठवले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.
बंदच्या काळात भाविकांशिवाय साज-या झालेल्या गुढी पाडव्याला भाविकांनी याच माध्यमातून ५ लाख ३५ हजारांची देणगी पाठविली. विशेष म्हणजे देशभरात २२ मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊन करण्यात आले. या दिवशीही भाविकांनी आॅनलाईनद्वारे ३ लाख ६१ हजारांचे दान संस्थान तिजोरीत जमा केले. आर्थिक वर्षाखेर, ३१ मार्चला भाविकांनी सर्वाधिक १३ लाख १७ हजारांची देणगी दिली.
    रामनवमीला लाखो भाविक पदयात्रेने शिर्डीला येतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनने भाविकांची निराशा झाली. शिर्डीला येणे शक्य झाले नाही तरी अनेकांनी साईबाबांना आॅनलाईन देणगी पाठवलेली दिसते. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात २३ लाखांहून अधिक रक्कम संस्थानला प्राप्त झाली असल्याचे संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी सांगितले.
 नव्वद वर्षापूर्वी समाधी मंदिर व द्वारकामाईत प्रत्येकी एक दक्षिणा पेटी होती. १९२९ चे पेटीचे वार्षिक उत्पन्न ६८७ रुपये होते. पूर्वी मंदिराच्या पेटीत संस्थानकडून रोज एक रूपयाची दक्षिणा टाकण्यात येत असे. हेच ३६५ रुपये पेटीत जमा होत. चार उत्सवातील दान पेट्यांचे उत्पन्न उत्सव व्यवस्थापकाकडे जात असे. या रकमा वजा केल्या तर दानपेटीत वर्षाकाठी अवघे तीनशे रुपये म्हणजे दिवसाकाठी रूपयाही पडत नसे. आज मंदिर बंद असतांनाही आॅनलाईनमुळे रोज साडेपाच लाखाहुन अधिक रक्कम देणगीत येत आहे. एरवी सरासरी रोज एक कोटींची दक्षिणा मिळते.
 

Web Title: Locked down flights of Sai Institute also; One crore donation of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.