Last chance to reform Naxals: Maninder Singh Bitta | नक्षलवाद्यांना सुधारण्याची शेवटची संधी : मनिंदरसिंह बिट्टा
नक्षलवाद्यांना सुधारण्याची शेवटची संधी : मनिंदरसिंह बिट्टा

शिर्डी: नक्षलवाद्यांना आता सुधारण्याची संधी आहे. ते भारतीयच आहेत. त्यांनी भविष्याचा विचार करावा अन्यथा त्यांचे नामोनिशाण राहणार नाही. त्यांना सध्याचे सरकार जंगलातून काढून ठोकेल, असा इशारा अखिल भारतीय दहशतवाद विरोधी आघाडीचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांनी दिला.
माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी घोटाळे करून देशाला लुटले आहे़ त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला हवी़ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आजवर कोणी केली नव्हती़ हा आजचा हिंदुस्थान आहे़ जो चुकेल, घोटाळे करील तो आत जाईल, असेही बिट्टा म्हणाले़ अभिनंदनला ज्याने पकडले, त्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सुद्धा मारण्यात आले़ यापुढे प्रत्येक गोष्टीचे उत्तर दिले जाईल़
शिर्डीत शासकीय विश्रामगृहावर बिट्टा यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला़ ३७० कलम रद्द झाल्याने काश्मिरला नवीन स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधान, एक राष्ट्रगीताने काश्मिरला नवी ओळख मिळाली आहे़ आता काश्मिरचा नव्हे तर पाकव्याप्त काश्मिर हाच मुद्दा शिल्लक आहे़ दहशतवादाला खतपाणी घालणारे व कॅन्सरसारखे असलेले ३७० कलम कधी रद्द होईल, असे वाटत नव्हते़ मात्र मोदी-शहांनी धाडसी निर्णय घेतला़ त्यांच्या या राष्ट्रहिताच्या निर्णयाबद्दल नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे होते़

काश्मिरात हळूहळू शांतता प्रस्थापित होईल
एक वर्षानंतर जेव्हा काश्मिरमध्ये शिक्षण, रोजगार, व्यापार, उद्योग आदी विकास होईल, तेव्हा यापूर्वीच्या सत्तर वर्षातील सरकारांना जनता जाब विचारेल़ मोदी-शहांनी केले ते त्यांनी आजवर का केले नाही याचे त्यांना उत्तर द्यावे लागेल, असे बिट्टा म्हणाले़ काश्मिरात हळूहळू शांतता प्रस्तापित होईल व जनजीवन सामान्य होईल़ त्यादृष्टीने सरकार योग्य पावले टाकत असल्याचेही मतही बिट्टा यांनी व्यक्त केले़


Web Title: Last chance to reform Naxals: Maninder Singh Bitta
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.