Large decline in sugarcane FRP in Nagar district this year | नगर जिल्ह्यात उसाच्या एफआरपीत यंदा मोठी घट

नगर जिल्ह्यात उसाच्या एफआरपीत यंदा मोठी घट

शिवाजी पवार

श्रीरामपूर : मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना त्यांचा एफआरपी निश्चित करून पत्रे पाठवली आहेत. कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी शेतकऱ्यांना उसाचे दर माहिती झाले नव्हते. त्यामुळे एफआरपीबाबत उत्सुकता होती. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन पाळले होते. त्यामागील कारण याच पत्रात दडले आहे. शेतकरी व सभासदांची नाराजी नको म्हणून कोणीही दर जाहीर करण्याचे धाडस दाखविले नाही. पूर्वी अनेक कारखाने हंगामाच्या प्रारंभी दर जाहीर करून उसाची पळवापळवी करीत होते.

चालू गाळप हंगामात सर्वच कारखान्यांकडे मुबलक व किंबहुना वाढीव ऊस आहे. त्यामुळे वाढीव दराच्या स्पर्धेपासून कारखानदार दूर राहिले. मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी पंढरपूर, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतून ऊस मिळवला. त्यामुळे तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ८०० रुपयांवर गेले. त्याचाही भुर्दंड आता शेतकऱ्यांना कमी दराच्या रूपात बसला आहे.

यावर्षी श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचा एफआरपी (२ हजार ६६१) सर्वाधिक ठरला आहे. त्या खालोखाल तनपुरे (२ हजार ५७५) व अंबालिका (२ हजार ५१३) कारखान्यांचा दर निघाला आहे. वृद्धेश्वर व युटेकचे दर २ हजार रुपयांखाली आहेत.

असा ठरतो ऊस दर

केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्यावर २८६ रुपये दर मिळतो. मात्र, त्यातून ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा केला जातो.

का घटला उतारा

मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी राज्यभरातून मिळेल तसा ऊस उपलब्ध केला. त्यामुळे कुठूनही गुणवत्तापूर्ण ऊस मिळाला नाही. कार्यक्षेत्रातसुद्धा उसाला पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे साखर उतारा घटला.

कारखाने व त्यांचा एफआरपी -

अगस्ती : २,४५५, अशोक : २,१८८, ज्ञानेश्वर : २,०७४, कुकडी : २,४९५, प्रसाद शुगर : २,०९५, प्रवरा : २,२१९, गणेश : २,२२९, नागवडे : २,६६१, तनपुरे : २,५७५, कोपरगाव : २,३५५, संगमनेर : २,२४५, संजीवनी : २,०४५, केदारेश्वर : २,०५७, साईजन : २,३०५, गंगामाई : २,०३६.

एफआरपी अंतिम दर नाही

एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थांच्या एकूण उत्पन्नातील ७५ टक्के पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात. तोच अंतिम भाव ठरतो.

 

Web Title: Large decline in sugarcane FRP in Nagar district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.