The husband left the world while saying goodbye; The story of an unfortunate woman | जन्मदात्रीला निरोप देता-देता पतीनेही जग सोडले; दुर्दैवी महिलेची कहाणी 
जन्मदात्रीला निरोप देता-देता पतीनेही जग सोडले; दुर्दैवी महिलेची कहाणी 

कोल्हार : जन्मदात्री आईने आठ दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. त्या दुखातून सावरत नाही तोच तिच्या आयुष्याचा आधार असलेला पतीही जग सोडून गेला. या दोन्ही दुर्दैवी घटनेमुळे नियतीने ओढवलेल्या दु:खातून सावरायचे कसे अन जगायचे कसे ? असा प्रश्न कोल्हार येथील छाया ताराचंद सुरसे यांना पडला आहे.
कोल्हार येथे वास्तव्यास असलेल्या छाया ताराचंद सुरसे यांच्या आयुष्यात अचानक आभाळ कोसळले. छाया यांचे माहेर राहाता तालुक्यातील सावळीविहीर. आठ दिवसांपूर्वी त्यांची आई सिंधुबाई बाबूराव जगताप यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे छाया माहेरी होत्या. शनिवारी (दि.९) त्यांच्या आईचा दशक्रिया विधी होता. तोच आईच्या दु:खातून न सावरलेल्या छाया यांच्यावर काळाने दुसरा मोठा आघात केला. आयुष्याचा जोडीदार असलेला  पती ताराचंद यांनी कोल्हार येथील राहत्या घरात गुरुवारी गळफास घेऊन कायमची साथ सोडली.
नाभिक संघटनेचा तालुका अध्यक्ष असलेले ताराचंद यांचे केवळ नाभिक समाजच नाही तर गावातील प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध होते. सामाजिक कामात अग्रेसर असलेले अन मितभाषी, हसतमुख असलेल्या ताराचंद यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. ताराचंद यांच्या पाठीमागे आई, मुलगा, मुलगी आहे. बापाच्या अशा यावेळी जाण्याने ही मुलं सुद्धा पोरकी झाली आहेत. 
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने छायाने जमेल ती कामे करून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. आजही अनेकांना जेवणाचे डब्बे बनवून देण्याचे काम छाया करतात. शेखर व शुभम ही मुलेही शिक्षणासोबत वडिलांना सलूनच्या दुकानात कामात मदत करीत होती. अगोदर आईची छाया, त्यानंतर पतीची छाया हरपल्याने कुटुंब दु:खात हरवले आहे. 

Web Title: The husband left the world while saying goodbye; The story of an unfortunate woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.