सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन

By अरुण वाघमोडे | Published: January 3, 2024 08:15 PM2024-01-03T20:15:09+5:302024-01-03T20:15:19+5:30

महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

Have you applied for a solar pump Beware of fraudulent SMS An appeal to the farmers of Mahaurja | सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन

सौरपंपासाठी अर्ज केलाय? फसव्या एसएमएसपासून सावध राहा; महाउर्जाचे शेतकऱ्यांना आवाहन

अहमदनगर: प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी केले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक लीना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 

या योजनेअंतर्गत ३, ५ व ७.५ एच.पी क्षमतेचे सौर कृषिपंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत. सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. यासाठी लाभार्थ्यांना एसएमएस पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास १ लक्ष ४ हजार ८२३ सौर कृषिपंपांसाठी मान्यता दिली. या मान्यतेनुसार महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

महाऊर्जाने योजना राबविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश (एसएमएस) पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळावरून शेतकऱ्यांनी अर्ज भरावा तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी बनावट एसएमएस प्राप्त झाला असेल तर अशा एसएमएस पासून सावध रहावे. असे आवाहनही महाऊर्जाद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: Have you applied for a solar pump Beware of fraudulent SMS An appeal to the farmers of Mahaurja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.