निळवंडे धरणातून आठ हजार क्युसेकने पाणी सोडले

By सुदाम देशमुख | Published: November 26, 2023 05:12 PM2023-11-26T17:12:54+5:302023-11-26T17:14:05+5:30

भंडारदरा व निळवंडे धरणातूनच सर्व पाणी सोडले जाणार आहे.

Eight thousand cusecs of water was released from Nilwande dam | निळवंडे धरणातून आठ हजार क्युसेकने पाणी सोडले

निळवंडे धरणातून आठ हजार क्युसेकने पाणी सोडले

राजूर (जि. अहमदनगर) : रविवारी दुपारपासून  निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी झेपावले आहे. या धरणातून ८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.

जायकवाडीसाठी नगर जिल्ह्यातील प्रवरा समूहातून ३.३६ दलघफू पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिले आहेत. मात्र नगर जिल्ह्यातील शेतकरी तसेच नेत्यांचा पाणी सोडण्यास विरोध होता. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत साशंकता होती.मात्र शुक्रवारी या बाबतचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री दहा वाजता  निळवंडे धरणातून शंभर क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता.

टप्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार होती. मात्र असे न करता रविवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून वीज निर्मितीसाठी ३२५ तर स्पीलवे मधून ७ हजार ६७५ असे एकूण ८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. रविवारी दुपारी विसर्गात वाढ करते वेळी निळवंडे धरणातील पाणीसाठा ८ हजार १०० दलघफु इतका होता.

भंडारदरा व निळवंडे धरणातूनच सर्व पाणी सोडले जाणार आहे. यामुळे भंडारदरा धरणाच्या विसर्गातही रविवारी दुपारी साडे बारा वाजता धरणाचे दोन्ही लोखंडी वक्र दरवाजे चार फुटाणे उचलत स्पिलवेमधून ७ हजार १८० तर वीज निर्मितीसाठी ८२० असे एकूण ८ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरूवात झाली. रविवारी दुपारी पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ९ हजार ८९ दलघफु इतका होता.

दरम्यान, भंडारदराचे पाणी निळवंडे धरणात जमा होते व निळवंडेमधून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावे, वस्त्यांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Eight thousand cusecs of water was released from Nilwande dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.