Drought-prone legislator | दुष्काळाला छेद देणारा आमदार
दुष्काळाला छेद देणारा आमदार

अहमदनगर : नगर तालुका नगर शहरालगत व बागायत जिल्ह्यात समाविष्ट असला तरी तालुक्यात जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. डोंगराळ प्रदेश असला तरी पाऊस कमीच पडतो. रस्त्यांची अवस्थाही फार चांगली नाही. मात्र नगर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडून कुकडी, भीमा, घोडनदीचे लाभक्षेत्र, तर उत्तरेकडून मुळा, प्रवरा, गोदावरीचे लाभक्षेत्र. मध्यभाग गर्भगिरीच्या डोंगराने व्यापलेला. महाराष्टÑाच्या कृष्णा खोरे व गोदावरी खोरे यात विभागणी करणारी हीच डोंगररांग अगदी खारेकर्जुनेपासून पाथर्डी रोडवरील मेहेकरी, आगडगाव, रतडगाव गावांपर्यंत आहे. ही गावे गोदा-कृष्णा खोºयांची सीमा नक्की करतात. या डोंगरमाथ्याच्या उत्तरेकडे पडणारे पावसाचे पाणी गोदावरी खोºयात, तर दक्षिणेकडील पाणी कृष्णा खोºयामार्फत वाहते.  अशा वैशिष्ट्यपूर्ण भूभागाचे आमदार म्हणून कि. बा. उर्फ काकासाहेब म्हस्के यांनी प्रतिनिधीत्व केले. 
काकांचे लहानपण अतिशय हलाखीत गेले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नगर- अकोळनेर-भोरवाडी रस्त्यावर मैल कामगार म्हणून काम केले. तेव्हाच काकांना त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीचा रस्ता सापडला. या रस्त्यावर मैल कामगार म्हणून काम करत असताना त्यावेळच्या जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष व अकोळनेर गावचे अनंतराव जाधव  उर्फ भाऊ त्यांच्या घोड्याच्या टांग्यातून लोकल बोर्डाचे काम पाहण्यासाठी नगरकडे चालले असताना काका त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी काकांकडे कामाच्या तपशिलाची विचारपूस करता हा चुणचुणीत, तल्लख मुलगा यार्ड, फुटात आकडेवारी सांगू लागला. ‘तू आकडेवारी सांगतोस,  शिकलेला दिसतोस, असे भाऊ म्हणताच, ‘होय मी व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा दिली आणि काही कामधंदा  नाही म्हणून या कामावर आलो’ असे सांगितल्यावर भाऊंनी मास्तर होतो का? विचारत काकांना टांग्यात बसवले. त्यानंतर काही दिवसांतच काका अकोळनेरच्याच शाळेत गुरुजी म्हणून कामास लागले. 
पुढे हीच शिदोरी घेत काकांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजामार्फत जिल्ह्यातले पहिले विधी महाविद्यालयच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांचे जाळेच निर्माण केले. जिल्हा लोकल बोर्डाच्या खेड्यापाड्यातील शाळेत जाण्यासाठी एका बाजूला शिक्षक मिळत नसताना काकांनी जिल्हा साक्षरता मंडळ या सेवाभावी संस्थेमार्फत कै. बापूसाहेब भापकर, कै. बाळासाहेब ऊर्फ ह. कृ. काळे यांच्या सहकार्याने व्हालंटरी शाळा चालविल्या. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हा शिक्षणाचा असमतोल सांभाळण्याचे काम झाले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत खजिनदार म्हणून काम करताना संस्थेला आवश्यक तो निधी मिळविण्यासाठी व संस्था चालवित असलेल्या बोर्डिंगमधील धान्यसाठा उभा करण्यास काकांनी व त्यांच्या सहकाºयांनी सुगीच्या दिवसात शेतकºयांच्या खळ्यात उभे राहून धान्यासाठी भिक्षांदेहीसुद्धा केली. प्राथमिक शिक्षकांची आर्थिक परिस्थिती स्वअनुभवातून माहित असल्यामुळे काकांनी प्राथमिक शिक्षकांच्या भवितव्यासाठी मोठे योगदान दिले. 
शिक्षक नेते कै. दादासाहेब दोंदे, माजी आमदार कै. फलके गुरुजी यांच्यासमवेत देशव्यापी संप यशस्वी करून शिक्षकांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे काम काकांनी केले. प्रापंचिक अडचणीत सापडलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदी बाजारातील ऐक्य मंदिरमध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी चालवून शिक्षकांचे आर्थिक नियोजन करण्याचे महत्त्वपूर्ण काम काकांनी केले. शिक्षकांच्या पाल्यांची नगर शहरात शिक्षणाची  सोय व्हावी म्हणून लालटाकीला अध्यापक बालकाश्रम हे निवासी बोर्र्डिंग काढले.
अकोळनेरमध्ये नोकरीच्या काळात त्यांचे समवयस्क अनंतराव भाऊंचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे सदस्य कॉम्रेड रावसाहेब (आबा) जाधव व आमचे चुलते कॉम्रेड गजाबापू भोर यांच्याबरोबर सामाजिक चळवळीचे त्यांनी अवलोकन केले. लाल निशाण, कम्युनिस्ट पक्ष व संयुक्त महाराष्टÑ समिती विचारांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी काकांनी सभा, मोर्चे, आंदोलनातून आवाज उठवला. 
पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काका काँग्रेस पक्षात सामील झाले. १९६७ मध्ये त्यांनी नगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान आमदार कॉम्रेड बाळासाहेब नागवडे यांचा पराभव करून विजय मिळवला.  
काकांचे आयुष्य म्हणजे समाज शिक्षकरूपी आदर्श. काकांचे गोरेगोमटे व्यक्तिमत्त्व त्यांचे पांढरेशुभ्र नेहरू शर्ट, टोपी व तलम धोतरामध्ये खूपच खुलून दिसे. काका म्हणजे खराखुरा व्यवहारी माणूस. एकदा मला काका एस.टी. स्टॅण्डवर बाहेरगावी निघालेले भेटले. मी त्यांना भेटून पळून जायला लागलो तर त्यांनी त्यांची एस.टी. लागेपर्यंत मला गप्पात गुंतवले. स्टँडवर गाडी लागल्यावर मी त्या कंडक्टरला गाठून आमदार कि. बा. काकांना तुमच्या गाडीने नेवाशाला जायचंय, असे सांगितल्यावर तो कंडक्टर गर्दीतून वाट काढीत काकांना आमदारांच्या राखीव सीटवर घेऊन गेला. यातून काकांची लोकप्रियता लक्षात येते.
मी १९७८ साली वकील झाल्यानंतर काकांना भेटायला गेलो. माजी खासदार अ‍ॅड. चंद्रभान पाटील आठरे यांच्याकडे शिकण्यासाठी जात आहे, असे काकांना सांगितल्यावर ‘तू गुरू तर चांगला निवडला आहे, आता छोटी-मोठी जागा पाहून स्वतंत्रपणे बसत जा, असे मला सांगितले. ‘अशा रहदारीच्या रोडवर जागा मिळणार नाही किंवा परवडणार नाही,’ असे मी म्हणालो. तेव्हा काकांनी ‘वकिलाचे आॅफिस म्हणजे काही किराणा दुकान आहे का? दिसले दुकान की गिºहाईक दुकानात घुसणार. अरे कोणत्या वकिलाकडे जायचे हे माणूस घरीच ठरवून येत असतो. त्यामुळे त्याची चिंता नको करू. तोच पक्षकार कायम बरोबर राहतो जो अडचणीतील पत्ता सुद्धा शोधीत येतो’, असे सांगत काकांनी वकिलीचा सल्ला दिला. 
काकांचे चिरंजीव डॉ. सुभाष म्हस्के हे दरवर्षी काकांच्या नावे पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करतात. गेली १२ वर्षे या पुरस्कार सोहळ्यात निवड समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो.

नगर तालुक्यात पाझर तलावांचे मोठे काम
ज्या नगर तालुक्याचे काका आमदार झाले, तो तालुका कायम दुष्काळी म्हणून गणलेला.  म्हणजे काका विधानसभेत बोलायला उभे राहिले की, विनोदाने सर्वजण त्यांना ‘दुष्काळ बोलायला लागला’ असे संबोधत. पाण्याचे कायमचे स्त्रोत नाहीत. दक्षिणेला पुणे जिल्ह्यात कुकडी प्रकल्प, तर उत्तरेला मुळा धरण असताना नगर तालुका मात्र पाण्यासाठी झुंजत होता. त्यामुळे काकांनी विधानसभेत वेळोवेळी चर्चा घडवून आणत पाझर तलावाची संकल्पना वैधानिक पातळीवर, प्रशासकीय पातळीवर यशस्वीपणे राबविली. नगर तालुक्यातील प्रत्येक गावात काकांनी पाझर तलाव बांधले. मुळा नदीचे अतिरिक्त  पाणी वापरून ‘भोरवाडी’ धरण बांधण्याचे काकांचे स्वप्न अधुरेच राहिले. काका जर पुढील काळात आमदार राहिले असते तर ‘भोरवाडी’ साकारलेच असते, शिवाय नगर तालुक्यात सहकारी साखर कारखाना जीवंत राहिला असता. 


अ‍ॅड. सुभाष भोर (सरकारी वकील, अहमदनगर)

Web Title: Drought-prone legislator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.