CoronaVirus: two more infected patient found in Ahmednagar hrb | CoronaVirus: अहमदनगरमध्ये आणखी दोघांना कोरोनाची लागण; परदेशातून आलेले

CoronaVirus: अहमदनगरमध्ये आणखी दोघांना कोरोनाची लागण; परदेशातून आलेले

अहमदनगर  : महाराष्ट्रात उपचार घेऊन बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा दिलासा देत असताना दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण आढळून येत आहेत. अहमदनगरमध्ये आजच पहिल्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन नवे रुग्ण सापडले आहेत. 


दोघेही परदेशातून भारतात आले असून एक फ्रान्स आणि दुसरा आयव्हरी कोस्ट येथून आलेला आहे. या दोघांच्या ९ स्थानिक नागरिक संपर्कात आलेले आहेत. त्यांना प्रशासनाने विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. 


या दोघांच्या संपर्कात अन्य काही व्यक्तीही आलेल्या आहेत. यामुळे त्यांचा शोध सुरु केला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

ल्ह्यात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे  दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो  कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्या रुग्णाला आता आरोग्य यंत्रणेच्या तपासणीनंतर आज (रविवारी) घरी सोडण्यात येणार आहे.
आणखी १४ दिवस या रुग्णाला घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. आपल्या आरोग्य यंत्रणेने अतिशय कष्ट घेतले. त्या रुग्णावर उपचार करणा-या सर्व डॉक्टर्स,  नर्स आणि वॉर्डबॉय यांचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कौतूक करीत आभार मानले.पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पहिल्यांदा नगर शहरातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलत त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवले होते. त्या अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तत्काळ त्याला बूथ हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. २७ मार्च रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल आज प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: two more infected patient found in Ahmednagar hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.