Corona test will be found if walking on the road for no reason | विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास होणार कोरोना चाचणी

विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास होणार कोरोना चाचणी

पाथर्डी : शहरात विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्या संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार असून सोमवारपासून (दि.१९) पाथर्डी नगर परिषद हद्दीतील हॉस्पिटल, मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शुक्रवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी आ. मोनिका राजळे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, पशुवैद्यकीय अधिकारी जगदीश पालवे, नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद, डॉ. अशोक कराळे आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरात व तालुक्यात आणखी कोविड केअर सेंटर उभारणी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच जास्तीत जास्त खासगी हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मान्यता देणे, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे, भाजीपाला बाजारात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत.

खासगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरसंदर्भात प्रस्ताव दाखल झाल्यास निकषात बसणाऱ्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे डॉ. अशोक कराळे यांनी सांगितले.

--

४६६ रुग्णांवर उपचार सुरू

पाथर्डी तालुक्यातील ३४ हजार २३१ जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यातील ६ हजार ७१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ४६६ सक्रिय रुग्ण उपचार घेत असल्याचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी सांगितले.

Web Title: Corona test will be found if walking on the road for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.