तरूणीवर वाहनातच अत्याचार; वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 22:51 IST2019-11-21T22:51:25+5:302019-11-21T22:51:38+5:30
खासगी वाहनाने शहरात नोकरीनिमित्त येताना वाहनचालकाने तरूणीवर वाहनातच अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस मैदानाजवळ घडली.

तरूणीवर वाहनातच अत्याचार; वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर : खासगी वाहनाने शहरात नोकरीनिमित्त येताना वाहनचालकाने तरूणीवर वाहनातच अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस मैदानाजवळ घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरातील २१ वर्षीय तरूणी नोकरीनिमित्त दररोज नगर शहरात येते. मंगळवारी (दि.१९) सायंकाळी ती आईसोबत नगर-जामखेड रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबली होती. त्या दरम्यान, जामखेडकडून नगरकडे येताना तिने एका पीकअप वाहनचालकाला हात केला. सदर वाहनचालकाने गाडी थांबवली. आईला निरोप देऊन ही तरूण या वाहनात बसली. गाडीत या दोघांशिवाय कोणीच नव्हते. हिच संधी साधून या वाहनचालकाने नगरजवळ आल्यानंतर क्लेरा ब्रुस मैदानाजवळ गाडी थांबवली.
गाडीचे दरवाजे, काचा बंद करून जबरदस्तीने या तरूणीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून वाहन घेऊन पळून गेला. तरूणीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध भादंवि कलम ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.