धरमडी डोंगरावर युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:20 IST2017-10-23T16:10:21+5:302017-10-23T17:20:48+5:30
महात्मा फुले कृषी विदयापीठ परिसरात असलेल्या धरमडी डोंगरावर सोमवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला़ डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

धरमडी डोंगरावर युवकाचा खून
राहुरी(अहमदनगर) :महात्मा फुले कृषी विदयापीठ परिसरात असलेल्या धरमडी डोंगरावर सोमवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला़ डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
मृतदेह पहाण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत पोलीस पाटील आहिरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक धनशाम पाटील, उपविभागीय अधिकारी अरूण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पो.हे.कॉ.संजय शिंदे, संजय पठारे, काशिनाथ मरकड यांनी घटनास्थळी माहिती घेतली़ श्वान पथक व ठसे तज्ज्ञही घटनास्थळी दाखल झाले़
धरमडी परिसरात सावळ्या रंगाचा व २५ वर्ष वयाचा पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला़ मृतदेहाजवळ सँडेल व अंडरपँट आढळून आली़ मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे कपडे नसल्याने पोलिसांनी परिसर पिंजून काढला़ मात्र कुठेही कपडे आढळून आले नाही़ दारू पाजून खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ युवकाबाबत कुणाला माहिती असल्यास राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन राहुरी पोलिसांनी केले आहे़