खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्यानचे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:27 IST2020-06-05T16:27:30+5:302020-06-05T16:27:56+5:30
खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या जाचामुळे गोंधवणी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघडकीस आली आहे.

खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्यानचे तरुणाची आत्महत्या
श्रीरामपूर : खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या जाचामुळे गोंधवणी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी कॉल डिटेल्स तपासले जाणार असून कंपनीचे प्रतिनिधी चौकशीच्या रडावर आले आहेत. वाकडी रस्त्यालगत धनगरवाडी फाटा येथे संतोष घनश्याम पालकर (वय ३८) याने गत शुक्रवारी आत्महत्या केली होती. त्यानंतर पालकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आल्याने घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.
दोन खासगी फायनान्स कंपन्यांकडून पालकर यांनी कर्ज घेतले होते. वसुलीकरिता सारखा तगादा करीत होते असा आरोप पालकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले आहे.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान यांनी पालकर यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींची चौकशी केली जाईल अशी माहिती ‘लोकमत’ला दिली. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ चिठ्ठीवरून ठोस निष्कर्ष काढता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
मयत पालकर यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.