म्हाळादेवीच्या जलसेतूचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:09+5:302021-03-09T04:23:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामांनी गती घेतली आहे. म्हाळादेवी येथील प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम ...

म्हाळादेवीच्या जलसेतूचे काम अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामांनी गती घेतली आहे. म्हाळादेवी येथील प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम ७० टक्के झाले आहे. अपेक्षित २०२२ पर्यंत जलसेतू पूर्ण होईल. मात्र, ५० वर्षांत निळवंडे प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही ही सल दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.
१९७० ला अवघ्या ७ कोटी ९३ लाख रुपये मंजुरीचा निळवंडे प्रकल्प, आता २ हजार ८५० कोटींवर गेला आहे. २०१७ ला प्रकल्पाला चौथी सुधारित मान्यता मिळाली. ती २ हजार ३६९ कोटी ९५ लाख इतकी होती. आता प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा अपेक्षित खर्च आणखी १ हजार ३५० कोटी आहे. आतापर्यंत पंधराशे कोटी खर्च झालेत. यंदा ५४० कोटींची मागणी आहे. ९० च्या दशकात युती शासनाच्या काळात निळवंडेच्या भिंतीची प्रत्यक्ष पायाभरणी झाली. धरणाचे काम आठ-दहा वर्षांपूर्वी पूर्ण होऊन ८.३२ टीएमसी पाणीसाठा होऊ लागला आहे. धरण पूर्ण मात्र कालव्यांची कामे बाकी आहेत.
तालुक्याच्या पूर्वेकडील लाभक्षेत्रात कालव्यांचे मातीकाम ८०-८५ टक्के पूर्ण झाले आहे. कळस खुर्द (ता. अकोले) येथील ७८० मीटर व कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील ४ किलोमीटर बोगदा खोदाईचे काम पूर्ण झाले आहे.
अकोले तालुक्यातील कालव्यांसाठी लागणारी ३१० हेक्टर शेतजमीन सरकारने मोबदला देऊन अधिग्रहित केली आहे. ५५० ते ६०० शेतकरी कालवा बाधित आहे. तालुक्यातील प्रवाही मुख्य निम्नस्तरीय डावा कालवा २८ किलोमीटर तर उजवा कालवा १८ किलोमीटर लांबीचा आहे. या डाव्या कालव्याचे ५० टक्के व उजव्या कालव्याचे ३० टक्के काम झाले आहे. कालव्यांची कामे प्रगतिपथावर असल्याचे कालवे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सांगितले.
म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम प्रगतिपथावर आहे. चौकोनी आकाराचा हा कालवा असून कालव्याच्या बाजूने १० फुटांचा रस्ता असणार आहे. याच कालव्याला खेटून उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे बंदिस्त पाइप टाकले जाणार आहेत.
....
१ हजार ४७५ मीटर म्हणजे दीड किलोमीटर लांबीच्या म्हाळादेवी जलसेतूचे जवळपास ३० टक्के काम बाकी आहे. २५ कोटी रुपयांचा हा जलसेतू २०२२ ला पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- संगीता जगताप, कार्यकारी अभियंता, निळवंडे प्रकल्प, अकोले.