सात नगरपालिकात महिला राज
By Admin | Updated: July 19, 2014 00:37 IST2014-07-18T23:32:06+5:302014-07-19T00:37:44+5:30
अहमदनगर : शुक्रवारी झालेल्या शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता या सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या़

सात नगरपालिकात महिला राज
अहमदनगर : शुक्रवारी झालेल्या शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता या सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या़ पाथर्डीच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र उदमले यांची निवड करण्यात आली़
महायुतीची मिरवणूक
शिर्डीच्या चौथ्या महिला नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अनिता विजय जगताप तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे निलेश मुकूंदराव कोते यांची बिनविरोध निवड झाली़ विशेष म्हणजे हे दोघेही सेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या पाठबळावर निवडून आले आहेत़ गुरुवारी (दि़१७) काँग्रेसनेही आपले उमेदवार मागे घेत अनिता जगताप यांना पाठिंबा दिला़ नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे नऊ तर सेना-भाजप-राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक होते़ शुक्रवारी (दि़१८) दुपारी दोनच्या सुमारास सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या अनिता जगताप व राष्ट्रवादीचे निलेश कोते मिरवणुकीने नगरपंचायत कार्यालयासमोर आले़ यावेळी गटनेते राजेंद्र गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सुरेश आरणे, किरण बर्डे, आशा कोते, साधना लुटे, मंदाताई गुंजाळ, स्विकृत नगरसेवक शिवाजी गोंदकर उपस्थित होते़
काळे-कोल्हे एकत्र
मोठ्या राजकीय घडामोडीनंतर काळे आणि कोल्हे गट एकत्र आले़ तरीही खांबेकरांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा अट्टहास सोडला नाही़ मिनल खांबेकर यांना केवळ स्वत:च्या मतावर समाधान मानावे लागले़ भाजपा सदस्या भारती वायखिंडे तटस्थ राहिल्या़ त्यामुळे २६ पैकी २४ अशा बहुमताने कोपरगावच्या नगराध्यक्षपदी ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई निवडून आल्या़ नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते़ कोल्हे गटातर्फे अधिकृत उमेदवारी संगिता संजय रूईकर यांना तर काळे गटाकडून ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना उमेदवारी देण्यात आली़ विद्यमान उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर यांनी कोल्हेंचे म्हणणे झुगारून उमेदवारी कायम ठेवली होती़ मतदान प्रक्रियेपर्यंत काळे आणि कोल्हे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती़ सभागृहात सभेचे कामकाज सुरू झाले तरीही कोणताच निर्णय होत नव्हता़ अखेर संजीवनी कारखान्याच्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये बसलेल्या माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आ़ अशोक काळे, बिपीन कोल्हे यांच्याकडून पालिकेत निरोप आला़ आणि अचानक कोल्हे गटाच्या अधिकृत उमेदवार संगिता रूईकर यांच्यासह २३ नगरसेवकांनी सातभार्इंच्या बाजूने हात उंचावून मतदान केले़ खांबेकर सभागृहात एकाकी पडल्या़ त्यांना स्वत:च्याच मतावर समाधान मानावे लागले़ भाजपाच्या एकमेव सदस्या भारती वायखिंडे तटस्थ राहिल्या़ सातभाई या कोपरगाव पालिकेच्या इतिहासातील ३५ व्या नगराध्यक्षा आहेत़ त्यांचे सासरे स्व़ वसंतरराव सातभाई हे १९७४ ते ७६ आणि १९८६-८७ या काळात नगराध्यक्ष होते़ त्यानंतर पती संजय सातभाई हे १९९३ ते ९६ या काळात नगराध्यक्ष होते़
उषा तनपुरे तिसऱ्यांदा विराजमान
राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाच्या डॉ़ उषाताई तनपुरे तर उपनगराध्यक्षपदी इस्माईल सय्यद यांची बिनविरोध निवड झाली़ निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली़ नगराध्यक्षपदासाठी तनपुरे यांच्या अर्जावर सुचक म्हणून दिनकर पवार तर अनुमोदक म्हणून अनिता पोपळघट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उपनगराध्यक्षपदासाठी इस्माईल सय्यद यांच्या अर्जावर सुचक म्हणून सोमनाथ तनपुरे तर अनुमोदक म्हणून सदाशिव सरोदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उपनगराध्यक्षपदासाठी अर्चना तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यानंतर उपनगराध्यक्षपदी सय्यद यांच्या नावाची घोषणा झाली़ यावेळी नगरसेविका गयाबाई ठोकळे, दिनकर पवार, सपना भुजाडी, सुनिल पवार, ज्योती पोपळघट, ताराबाई भुजाडी, अनिता पोपळघट, अनिल कासार, रावसाहेब तनपुरे, अरूण ठोकळे आदी उपस्थित होते़
श्रीरापुरात ससाणे
श्रीरामपूर नगराध्यक्षपदी राजश्री जयंत ससाणे व उपनगराध्यक्षपदी कांचन दत्तात्रय सानप यांची निवड झाली़ प्रांताधिकारी प्रकाश थविल हे पिठासन अधिकारी होते. त्यांना मावळते प्रशासक तथा तहसीलदार किशोर कदम, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्य केले. ससाणे, सानप यांच्यासह पक्षप्रतोद संजय फंड, संजय छल्लारे, दिलीप नागरे, अप्पा गांगड, श्रीनिवास बिहाणी, दत्तात्रय साबळे, अण्णासाहेब लबडे, राजेंद्र महांकाळे, आशीष धनवटे, राजन चुग, शामलिंग शिंदे, शाम अडांगळे, मुजफ्फर शेख, कैलास दुबय्या, अंजूम शेख, राजश्री सोनवणे, मंगल तोरणे, सुमैय्या पठाण, संगीता मंडलिक, जायदाबी कुरेशी, सुधा कांबळे हे सत्ताधारी व रजियाबी जहागीरदार या एकमेव विरोधी सदस्य असे एकूण २४ नगरसेवक विशेष सभेला उपस्थित होते़ नगराध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने ससाणे यांचा एकमेव अर्ज होता. उपनगराध्यक्षपदासाठीही सानप यांचा एकमेव अर्ज होता़ पिठासन अधिकारी थविल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
उदमले बिनविरोध
पाथर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र उदमले यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी दुपारी पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली़ रामगिरबाबा आघाडीच्या माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, बजरंग घोडके व राष्ट्रवादीच्या ज्योती बोरूडे हे गैरहजर राहिले. नगराध्यक्षपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव होते. उदमले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष दिपाली बंग यांच्यासह राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक व रामगिरबाबा आघाडीच्या वंदना टेके उपस्थित होते. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक असून राजीव राजळे यांना मानणारे दहा, आ. चंद्रशेखर घुले यांना मानणारे दोन तर प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांना मानणारे दोन नगरसेवक आहेत. उदमले हे राजळे गटाचे आहेत़
त्रिभुवन बारा मतांनी विजयी
देवळाली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती त्रिभुवन १२ मतांनी विजयी झाल्या़ उपनगराध्यक्षपदी काँगे्रसचे अनंत कदम यांची बिनविरोध निवड झाली़ निवडणूक निर्णय अधिकारी दानेश व सहाय्यक निवडणूक अधिकारी विनोद जळक यांनी त्रिभुवन व कदम यांची निवड जाहीर केली़ नूतन नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन यांचा माजी नगराध्यक्षा मंदाकिनी कदम यांनी सत्कार केला़ उपनगराध्यक्ष अनंत कदम यांचा माजी उपनगराध्यक्षा शुभांगीताई पठारे यांनी सत्कार केला़ नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सुरेंद्र थोरात यांनी अर्ज दाखल केला होता़ थोरात यांना ६ मतावर समाधान मानावे लागले़
विखे गटाचेच वर्चस्व
राहाता नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी लताबाई चंद्रभान मेहत्रे व उपनगराध्यक्षपदी संजय रामचंद्र सदाफळ यांची निवड करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी डी़ एऩ कर्डक व मुख्याधिकारी जयदीप पवार यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड घोषित केली़ निवडणुकीनंतर कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते मेहत्रे व सदाफळ यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, रघुनाथ बोठे, रामातात्या गाडे, सुभाष गाडेकर आदी उपस्थित होते़
थोरात गटाची बाजी
संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत दुर्गाताई तांबे व उपनगराध्यक्षपदी जावेद जहागीरदार यांनी विजय मिळविला़ त्यांनी अनुक्रमे अल्पना तांबे व अॅड. श्रीराम गणपुले यांचा पराभव केला.शुक्रवारी रामकृष्ण सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निचित यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया झाली. नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटातर्फे दुर्गाताई तांबे व विरोधी गटातर्फे अल्पना तांबे यांच्यात लढत झाली. हात वर करून उमेदवारास पसंती दर्शविण्यात आली. दुर्गाताई तांबे यांना २० मते पडली. तर अल्पना तांबे यांना ६ मते पडली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका अनिता बर्गे या उशिरा आल्याने त्यांना मतदानात सहभाग घेता आला नाही. उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधाऱ्यातर्फे जहागीरदार तर विरोधकांतर्फे अॅड. श्रीराम गणपुले रिंगणात होते. जहागीरदार यांना २१ व गणपुले यांना ६ मते पडली. मावळते नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग, गोरख कुटे, गजेंद्र अभंग, पूनम मुंदडा, शोभा पवार, जुलेखा शेख, नजमा मणियार, सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, अजय फटांगरे, मिलींद कानवडे, निखील पापडेजा आदी उपस्थित होते.