एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
By अण्णा नवथर | Updated: January 21, 2024 20:05 IST2024-01-21T20:05:09+5:302024-01-21T20:05:27+5:30
सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे?

एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
अण्णा नवथर/ अहमदनगर : मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, काही षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला, गोळ्या झाडल्या तरी एकही इंचही मागे हटणार नाही. काही गडबड झाली तर अशावेळी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभा राहा, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. नगर-पाथर्डी रोडवरील आगसखांड (ता. पाथर्डी) येथे पदयात्रेदरम्यान ते बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रविवारी सकाळी कल्याण- नगर- नांदेड- निर्मळ महामार्गावर नगर जिल्ह्यातील मीडसांगवी (ता. पाथर्डी) येथे सकाळी १० वाजता दाखल झाली. तिथे हजारो मराठा समाजबांधवांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली.
तरुणांसोबत महिलाही या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. तनपूरवाडी (ता. पाथर्डी) या गावात फुलांची उधळण, रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. या गावाजवळील फुंदे टाकळी फाटा आणि आगसखांड येथे पदयात्रेतील सहभागी नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पिठले-भाकरीचे भोजन घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी आगसखांड (ता. पाथर्डी) येथेच मार्गदर्शन केले.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? सात महिने वेळ दिला. आता सरकारला एक ताससुद्धा वेळ देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, हे निश्चित आहे. सरकारने आम्हाला त्रास किंवा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही.