पिण्याचे पाणी मुरते कुठे?
By Admin | Updated: April 20, 2016 00:10 IST2016-04-20T00:08:04+5:302016-04-20T00:10:04+5:30
ज्ञानेश दुधाडे/ सचिन पटारे, अहमदनगर/ वांबोरी उद्भवातील पाणी आटल्याने जिल्ह्यात अनेक पाणी योजना बंद पडल्या आहेत.

पिण्याचे पाणी मुरते कुठे?
ज्ञानेश दुधाडे/ सचिन पटारे, अहमदनगर/ वांबोरी
उद्भवातील पाणी आटल्याने जिल्ह्यात अनेक पाणी योजना बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जवळच्या उद्भवावरून पाण्याचे टँकर भरून जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना आणि एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून सर्रास पाण्याची गळती आणि चोरी सुरू आहे. गुंजाळे-पांढरीपूल दरम्यान, असणाऱ्या दोन जल शुध्दीकरण उपसा केंद्राच्या परिसरातही गळती आणि पाणी चोरीचा प्रकार सुरू आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंगमध्ये ही बाब समोर आली आहे.
दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. विशेषकरून दक्षिण भागात जनता पिण्यासाठी वनवन करत आहे. मुळा धरणाहून मिरी-तिसगाव पाणी योजनेची पाईपलाईन पांढरीपुलापर्यंत गेलेली आहे. या योजनेचा जलशुध्दीकरण प्रकल्प गुंजाळे आणि पांढरीपूल दरम्यान आहे. पाणी टंचाई असलेल्या पाथर्डी तालुक्यातील ३५ गावांसाठी या ठिकाणाहून दररोज ६० ते ६५ टँकर भरून त्याद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र, योजनेच्या पाईपलाईनवर वांबोरी फाटा ते जलशुध्दीकरण प्रकल्पादरम्यान, अनेक ठिकाणी पाणी गळती आणि चोरी सुरू आहे. यामुळे दर तासाला धरणातून उपसा होणारे पाणी आणि प्रत्यक्षात जलशुध्दीकरण प्रकल्पात पोहचणारे पाणी यात हजारो लीटरची तफावत दिसत आहे. याचा परिणाम दररोजच्या पाण्याच्या टँकरच्या खेपावर होताना दिसत आहे.
याच परिसरात एमआयडीसी पाणी योजनेचा जल उपसा प्रकल्प आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रकल्प अधिग्रहीत करून त्या ठिकाणाहून नेवासा तालुक्यातील २३ गावांना ७० पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे.
या ठिकाणी तर निम्म्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रात्रीच्या वेळी तर पाण्याला दाब नसल्याची तक्रार येथील कर्मचारी आणि टँकर चालकांनी केली. गेल्या आठवड्यात या ठिकाणी कामावर असणाऱ्या नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी जब्बार शेख यांना खासगी लोकांनी पाण्याचा टँकर भरून द्यावा, यासाठी रात्रीच्या वेळी धक्काबुक्की केल्याची घटना ताजी आहे. यामुळे कर्मचारी भयभीत आहेत.
वांबोरी फाटा ते गुंजाळे गावापर्यंत एकीकडे दुष्काळाचे विदारक दृश्य असताना दुसरीकडे मिरी-तिसगाव आणि एमआयडीसी पाणी योजनेच्या पाईपलाईनला खेटून असणारी शेती मात्र हिरवीगार आहे. या ठिकाणी घास, मका, कडवळ आणि अन्य चारा पिके जोमात आहेत. मिरी- तिसगाव जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या परिसरात भुईमुगाचे पीक जोमात आहे. याच परिसरातील विहिरींना भर दुष्काळात पाझर फुटला आहे. मात्र, कागदी घोडे नाचवणारे अधिकारी हे मान्य करण्यास तयार नाहीत.
लवकरच पाणी योजनांच्या पाईपलाईनला मुळा धरणापासून पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत. मिरी-तिसगाव योजनेतील पाणी गळतीवर मात करण्यासाठी ३ लाख ५० रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्याने दोन ठिकाणी पाणी गळतीची तक्रार प्राप्त झाली असून तातडीने पाहणी करण्यात येत आहे. जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर भरतात, त्या ठिकाणी पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त देवू.
- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून राहुरी तालुक्याच्या हद्दीत पाण्याची चोरी आणि गळती सुरू आहे. यामुळे पाण्याला दाब नाही. याचा परिणाम टँकरच्या खेपांवर होत आहे. रात्रीच्यावेळी खासगी लोकांकडून दमबाजी सुरू आहे. जीव मुठीत धरून काम करावे लागते.
-जब्बार शेख, पंचायत समिती कर्मचारी, नेवासा.