आदिवासी मच्छिमारांची ससेहोलपट कधी थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:07+5:302021-06-24T04:16:07+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयालगत मच्छिमारी करणारी जवळपास ८० आदिवासी कुटुंबे वस्ती करून राहतात. या लोकांना स्वत:ची जागा ...

आदिवासी मच्छिमारांची ससेहोलपट कधी थांबणार?
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयालगत मच्छिमारी करणारी जवळपास ८० आदिवासी कुटुंबे वस्ती करून राहतात. या लोकांना स्वत:ची जागा नसल्यामुळे स्वत:चे घर नाही. केंद्र सरकारचे २०२२पर्यंत सर्वांना घरे ही संकल्पना कशी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे सर्व लोक भूमिहीन असल्याने विसापूर धरणाच्या परिसरात झोपड्या करून राहतात. काही लोक मोलमुजरी करतात, तर काही मच्छिमारी करून उपजीविका करतात. काही मच्छिमार बांधव पिंपळगाव पिसा हद्दीत आठाचा मळा या ठिकाणी राहतात. ते ज्या ठिकाणी राहतात तेथे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसाठी विद्युत तारांचे जाळे झाले आहे. या तारा तुटून काही झोपड्या जळून खाक झाल्या. १ नोव्हेंबर २०१९ रोजी आठाचा मळा शिवारात विसापूर धरणात मच्छीमारी करत असताना पाण्यात विद्युत प्रवाह उतरला असल्याने सुभाष बापू घोलवड या ३२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी काही कुटुंबांना शेंडगे वस्तीजवळील गायरान क्षेत्रात तात्पुरती जागा दिली.
पिंपळगाव पिसा व विसापूर येथे शेकडो एकर शासकीय जमीन आहे. त्या ठिकाणी अनेक धनदांडग्या लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. मग या आदिवासी व भूमिहीन लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने जागा उपलब्ध करून या लोकांना घरकुल दिले नाही तर त्यांची ससेहोलपट थांबणार नाही. हे लोक कधी तलावाच्या काठावर एक बाजूला, तर कधी दुसऱ्या बाजूला सोयीनुसार सतत स्थलांतर करून फिरती वस्ती करून राहतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.
----
आम्हाला राहायला घरे व निश्चित ठिकाण नसल्याने आम्हाला जागा मिळेल तिथे झोपडी करून राहावे लागते. तेथे कोणत्याही नागरी सुविधा नसल्याने तलावाचे अथवा नाल्याचे पाणी प्यावे लागते. मुलांना शिक्षण घेता येत नसल्याने आमच्याप्रमाणे तेही अडाणी राहात आहेत. नेते व कार्यकर्ते फक्त निवडणुकांपुरते येतात. नंतर कोणी इकडे फिरकतही नाही.
-अलका शहाजी पवार / उमेश बापू घोलवड
पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा.
---
विसापूर धरणात मच्छिमारी करत असलेली आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आमच्या शेजारी आहे. त्यांची राहण्यासाठी व जगण्यासाठीची होणारी परवड पाहून दुख: होते. विसापूर परिसरात अनेक शासकीय जागा मोकळ्या पडलेल्या आहेत. यापैकी एखाद्या ठिकाणी या लोकांना जागा देऊन घरकुल योजना राबविण्यात आली पाहिजे.
-विरेंद्र कुंडलीकराव जगताप,
सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव पिसा.
--
२३ विसापूर आदिवासी
विसापूर जलाशयाच्या बाजूला असलेल्या आदिवासी कुटुंबांची घरे.