टेम्पोचे चाक निखळले; तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 16:03 IST2020-09-04T16:01:55+5:302020-09-04T16:03:49+5:30
नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोचा विचित्र अपघात घडला. या टेम्पोची मागील दोन्ही चाके निखळून पडली. त्यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवकला धडकले. यामुळे युवकाचा मृत्यू झाला.

टेम्पोचे चाक निखळले; तरुणाचा मृत्यू
नेवासा फाटा : नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोचा विचित्र अपघात घडला. या टेम्पोची मागील दोन्ही चाके निखळून पडली. त्यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवकला धडकले. यामुळे युवकाचा मृत्यू झाला.
गुरुवारी रात्री नेवासा फाटा येथील शेवगाव चौकाजवळ ही घटना घडली. संदीप जोंधळे (वय ३२) असे या अपघातातमृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. भरधाव वेगाने जाणा-या टेम्पोची (एम.एच.-१२, एन.एक्स.-६१५७) मागील बाजूची दोन्ही चाके निखळली. यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला गेले. एका मिठाईच्या दुकानाच्या समोरील खांबाला या चाकाची धडक बसली. तेथेच आपले फळाचे दुकान बंद करून उभ्या असलेल्या संदीप जोंधळे यांना त्या चाकाचा जोराचा फटका बसला. त्यामुळे डोक्याला गंभीर मार लागला. जखमी संदीप यांना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दहा वर्षांपासून नेवासा फाटा येथे जोंधळे यांचे फळांचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे.