हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; लाखो हेक्टरवरील पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:02+5:302021-06-24T04:16:02+5:30

अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने ...

The weather department's forecast was wrong again; Crops on millions of hectares in crisis | हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; लाखो हेक्टरवरील पिके संकटात

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; लाखो हेक्टरवरील पिके संकटात

अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आगामी आठवडाभर पाऊस न झाल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर मागील जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात बाजरी, तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन अशी पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदाही शेतकऱ्यांनी याच पिकांना प्राधान्य दिले. उडदाची तर उच्चांकी पेरणी झाली. आतापर्यंत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ९६ हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या ३१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

-----

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस..

तालुका पेरणी (हेक्टरमध्ये) झालेला पाऊस (मिमी)

नगर १९७७५ ११४

पारनेर २१४०५ ९५

श्रीगोंदा ८०९८ १७०

कर्जत ४४७६२ १०६

जामखेड ३०५१० ७०

शेवगाव ४४११ १०६

पाथर्डी ५३१० ८४

नेवासा १०१०९ ५८

राहुरी १७१६ ६६

संगमनेर २४०० ५४

अकोले ९७८३ १२९

कोपरगाव २९७४ ६४

श्रीरामपूर १९७ ५३

राहाता ८०८ ४५

------

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

५५००४१ (अपेक्षित पेरणी क्षेत्र)

१६०८२७ (आतापर्यंत झालेली पेरणी)

-----------

पावसाची स्थिती (मिमी)

अपेक्षित पाऊस (८३)

झालेला पाऊस (९०)

-----

सर्वात जास्त पाऊस मिमी

श्रीगोंदा तालुका

सर्वात कमी पाऊस मिमी

राहाता तालुका

-------------

पीकनिहाय क्षेत्र

झालेली पेरणी अपेक्षित पेरणी

भात : १६०९ १४०३६

बाजरी : १८८२५ १४०८९२

तूर : १३१७९ १५१२१

मूग : २१९१६ ४०३७८

उडीद : ५०७०४ १७५९६

सोयाबीन : १०९४३ ५४२९४

कापूस : १२९९४ ११४३५२

-------------------

गेल्यावर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस झाला होता. तसाच यंदाही सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख तूर, मुगाची या भागात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. पिकेही जोमात आली; मात्र नंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे.

-शिवाजी शेळके,

शेतकरी, नगर

---------

आम्ही प्रामुख्याने बाजरी, कापूस अशी खरीप हंगामात पिके घेतो. गेल्यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर पिके काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा तर पेरणी झाल्यानंतरच पावसाने दडी मारल्याने पुढे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यासाठी हवामान विभागाने योग्य अंदाज वर्तविणे गरजे आहे.

चंद्रभान फटांगरे,

शेतकरी, भातकुडगाव, ता. शेवगाव

Web Title: The weather department's forecast was wrong again; Crops on millions of hectares in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.