कोरोनाकाळात जिल्ह्यात बालविवाहाची लाट
By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:19+5:302020-12-05T04:35:19+5:30
तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाच्या तारखा निघतात. त्यामुळे येणाऱ्या काळातही बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ...

कोरोनाकाळात जिल्ह्यात बालविवाहाची लाट
तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाच्या तारखा निघतात. त्यामुळे येणाऱ्या काळातही बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बालसेवी संस्थेचे कार्यकर्ते एकत्र आले असून जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प या सर्वांनी केला आहे. या उपक्रमात बालकल्याण समितीसह चाईल्ड लाईन, स्नेहालय संचालित उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान, बाल संरक्षण कक्ष यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून सर्व ग्रामीण व शहरी भागात बालसंरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समित्यांना बालहक्कांची जपणूक व बालविवाह प्रतिबंध कायदा- २००६ चे विशेष प्रशिक्षण देऊन जनजागृती करण्यासाठी नियोजन केले असल्याचे शेख यांनी सांगितले.
कोरोनाकाळात थांबविले ७२ बालविवाह
"बालकल्याण समिती व चाइल्ड लाईन संस्थेने कोरोनाकाळात ७२ बालविवाह थांबविले आहेत. यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी बालविवाह झाले. मात्र, या घटना समोर आलेल्या नाहीत.
वयाची खात्री करूनच विवाहात सहभागी व्हावे
बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक तर शहरात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. बालविवाह झाल्यास संबंधित पालक, वऱ्हाडी, लग्नपत्रिका छापणारे, प्रिंटिंग प्रेसचे मालक, विवाह विधी करणारे मंगल कार्यालय मालक, बॅंडपथक, केटरिंग, मंडप डेकोरेशन या व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मुलाचे वय २१, तर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याची खात्री संबंधितांनी करावी. तसेच प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला, मुलींच्या वयाचा पुरावा घेऊन त्याचा अहवाल सरकारी व खासगी रुग्णालयांनी सादर करावा, असे आवाहन बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केले आहे.