नगरमध्ये एक दिवस उशिराने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:48+5:302021-09-21T04:23:48+5:30
अहमदनगर : मुळा धरणातून होणारा पाणीउपसा अमृत योजनेवरील दुरुस्तीसाठी मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे शहर व परिसरात एक ...

नगरमध्ये एक दिवस उशिराने पाणी
अहमदनगर : मुळा धरणातून होणारा पाणीउपसा अमृत योजनेवरील दुरुस्तीसाठी मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे शहर व परिसरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा केला जाणार असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले आहे.
महापालिकेच्यावतीने अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी दुपारी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शहर व परिसरातील जलकुंभ भरता येणार नाहीत. उपनगरातील बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, निर्मलनगर, सूर्यनगर, लक्ष्मी नगर, मुकुंदनगर, केडगांव, नगर - कल्याण रोड परिसर आदी भागाला नेहमीच्या पाणी वाटपानुसार मंगळवारी पाणीपुरवठा होत असतो. या भागाला बुधवारी नेहमीच्या वेळेनुसार पाणीपुरवठा होईल. शहराच्या मध्यवर्ती भागास सिद्धार्थनगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगाव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, माळीवाडा (काही भाग), बालिकाश्रम रोड, सावेडी, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर आदी भागाला बुधवारी पाणीपुरवठा होत असतो. या परिसराला गुरुवारी पाणीपुरवठा होणार आहे. तसेच ज्या भागाला गुरुवारी पाणीपुरवठा होतो, त्या भागातील नागरिकांना शुक्रवारी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.