नगरच्या आशुतोष लांडगेसह पुणेचा वानखेडे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:06+5:302021-03-09T04:24:06+5:30

अहमदनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बँकेच्या ...

Wankhede Gajaad of Pune with Ashutosh Landage of the city | नगरच्या आशुतोष लांडगेसह पुणेचा वानखेडे गजाआड

नगरच्या आशुतोष लांडगेसह पुणेचा वानखेडे गजाआड

अहमदनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बँकेच्या एका तत्कालीन संचालकाला अटक केल्यानंतर सोमवारी नगरमधून आशुतोष लांडगे याच्यासह पुणे येथील जयदीप वानखेडे याला अटक केली आहे.

कर्जदाराला अर्बन बँकेतून २२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यातील मोठी रक्कम लांडगे व वानखेडे यांच्या खात्यात वर्ग झाली होती. लांडगे याच्या खात्यावर ही रक्कम का वर्ग झाली तसेच त्याच्याकडून हे पैसे कुणाला दिले गेले याचा आता पोलीस छडा लावणार आहेत. याप्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चाैकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने शनिवारी नगर येथून बँकेचा तत्कालीन संचालक नवनीत शांतीलाल सूरपुरिया याला, तर चिंचवड येथून यज्ञेश बबन चव्हाण (रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. या अपहारात लांडगे व वानखेडे यांची नाव समोर येताच बाबर यांच्या पथकाने या दोघांना अटक केली.

काय आहे प्रकरण

मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्रिज पुणे या फर्मचे कर्जदार आरोपी यांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी कर्जप्रकरण केले. त्यासाठी तारण गहाण मिळकतीचा बनावट मूल्यांकन अहवाल दिला. कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालक सदस्यांनी तो अहवाल स्वीकारून बँकेची २२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजुदेवी हरिमोहन प्रसाद (सर्व रा. चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी), अभिजित नाथा घुले (रा. अहमदनगर) यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य, तसेच बँकेचे संचालक, सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

-----------------------------------------------

नगरची आर्थिक गुन्हे शाखेकडूनही अशाच कारवाईची अपेक्षा

बँकेच्या कर्ज अपहार प्रकरणात पिंपरी-चिंचवडची आर्थिक गुन्हे शाखा धडाकेबाज कारवाई करत आरोपींना अटक करत आहे. नगर येथील शहर सहकारी बँकेतही कोट्यवधी रुपयांचा कर्ज अपहार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अडीच वर्षे लोटले तरी या गुन्ह्यात डॉ. नीलेश शेळके याचा अपवाद सोडता एकाही आरोपीला अटक झालेली नाही. विशेष म्हणजे शेळके याला एलसीबीच्या पथकाने अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने नव्हे. तसेच या गुन्ह्याचे अद्यापपर्यंत दोषारोपपत्रही दाखल झालेले नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Wankhede Gajaad of Pune with Ashutosh Landage of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.