पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विस्तारीकरणासाठी पिंपळगाव व वडगाव येथील भूसंपादनास तीव्र विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील इतर हक्कात शासनाचे नाव लावलेले आहेत. ते शिक्के त्वरित हटवावेत, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अहवाल शासनास पाठविला; परंतु एमआयडीसीकडून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी बुधवारपासून (दि.१८) एमआयडीसी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांना निवेदन दिले. निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे प्रकाश डोंगरे, रामनाथ झिने, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, भानुदास सातपुते, सुभाष ढेपे, किसनराव कदम, जालिंदर शेवाळे, राजेंद्र गुंड, मनोज लहारे, किसन डोंगरे, राजू ढेपे आदींच्या सह्या आहेत.