मतदार नोंदणीस टाळाटाळ करणारा शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:05 IST2016-10-17T00:42:01+5:302016-10-17T01:05:40+5:30
अहमदनगर : कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या मतदारयादीत नाव घेण्यास टाळाटाळ करणारा शिक्षक शिवाजी संपत भालेराव यास निलंबित करण्यात आले

मतदार नोंदणीस टाळाटाळ करणारा शिक्षक निलंबित
अहमदनगर : कृषक समाजाच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांचे श्रीरामपूर नगरपालिकेच्या मतदारयादीत नाव घेण्यास टाळाटाळ करणारा शिक्षक शिवाजी संपत भालेराव यास निलंबित करण्यात आले आहे़ नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी ही कारवाई केली़
श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले़ या मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कृषक समाजाच्या अध्यक्षा आदिक यांच्यासह १४ मतदारांनी अर्ज दाखल केले़ ते अर्ज नगरपालिकेचे शिक्षक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शिवाजी भालेराव यांनी स्वीकारले़ परंतु आदिक यांच्यासह अर्ज मुदतीत तहसील कार्यालयात जमा झाले नाही़ परिणामी आदिक यांच्यासह मतदारांची नावे प्रारुप मतदारयादीत आलीच नाहीत़ याप्रकरणी आदिक यांनी न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने आदिक यांचे नाव घेण्याचे आदेश दिले़ या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली़ निवडणूक आयोगाने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे यांनी दिलेल्या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी वरील आदेश जारी केला़ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी शनिवारी प्रसिध्द झाली़ अंतिम मतदारयादीत आदिक यांच्या नावाचा समावेश आहे़ नगरपालिकेचे नगराध्यक्षपद प्रथमच जनतेतून निवडले जाणार आहे़ त्यात नगराध्यक्षपद सार्वसाधारण महिला वर्गासाठी खुले आहे़ अनुराधा आदिक यांनी मुंबई येथील मतदारयादीतील नाव रद्द करून ते श्रीरामपूर नगरपालिकेच्या मतदारयादीत नोंदविले़ परंतु त्यांच्या नावाचा समावेश प्रारुप यादीत झाला नसल्याने समर्थक नाराज झाले होते.