आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी, मोठी जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:17 IST2021-02-17T12:16:30+5:302021-02-17T12:17:11+5:30
डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्षांचा चिवचिवाट.... घामाघूम झालेले ग्रामस्थ.... सरपंचांनी घेतलेला पुढाकार.... आणि सर्वांच्याच अथक प्रयत्नांना आलेले यश. प्रसंग होता.. डोंगराच्या पायथ्याशी लागलेल्या आगीचा.

आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी, मोठी जीवितहानी टळली
केडगाव : डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्षांचा चिवचिवाट.... घामाघूम झालेले ग्रामस्थ.... सरपंचांनी घेतलेला पुढाकार.... आणि सर्वांच्याच अथक प्रयत्नांना आलेले यश. प्रसंग होता.. डोंगराच्या पायथ्याशी लागलेल्या आगीचा.
कामरगाव (ता. नगर) येथे मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटर अंतरावर काल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जानबाचा तलाव ते भैरवनाथ मंदिर दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून आग लागली. काही वेळातच सुमारे एक हजार मीटर परिघात आगीने रूद्ररूप धारण केले. अंधार असतानाही त्या ठिकाणे लख्ख प्रकाश दिसू लागला. ही बातमी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम कातोरे यांना समजली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यांनी गावातील २५ तरुणांना सोबत घेऊन घटना स्थळाकडे धाव घेतली.
प्रचंड उसळलेला आगडोंब पाहून जंगलातील हरीण, तरस, ससे, मोर, रानडुक्कर ई. प्राणी जीवाच्या आकांताने सैरभैर होऊन पळू लागली. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
यावेळी गावातील तरुणांनी ओला बारदाना, झाडांच्या पानांचे ढगळे हाती घेऊन तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दोन ट्रॅक्टरांनी आगीच्या पुढे खोल नांगरट केली. त्यामुळे आग विझवीण्यास आणखी मदत झाली.