गावपातळीवर थोरात-विखेंच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:07+5:302021-01-13T04:54:07+5:30

आश्वी : संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या गावांतील १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत ...

At the village level, the reputation of Thorat-Vikhen activists was tarnished | गावपातळीवर थोरात-विखेंच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला

गावपातळीवर थोरात-विखेंच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला

आश्वी : संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या गावांतील १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे या दोन गटांतील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा गावपातळीवर पणाला लागली आहे. १२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे या दोन गटांत चुरस पाहायला मिळते आहे.

कनोली, प्रिपीं लौकी, आजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रूक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रतापपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विखे गटाचेच तीन पॅनल असून, येथे विखेंच्या कार्यकर्त्यांमध्येच लढत होत आहे. पानोडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांकरिता २ अपक्षांसह एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीवर गत ५० वर्षांपासून थोरात गटाचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत येथे सत्तांतर घडले. ही ग्रामपंचायत विखे गटाच्या ताब्यात गेली. ती परत मिळविण्यासाठी थोरात गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे, तर या ग्रामपंचायतीवर वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी विखे गटाचे कार्यकर्तेही ताकद लावून आहेत. येथे यंदा प्रथमच दोन अपक्ष रिंगणात आहेत. या अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.

प्रिपीं लौकी आजमपूर या पाच हजार लोकसंख्येच्या गावात ११ जागांसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. थोरात व विखे या दोन प्रतिस्पर्धी गटांनी एकास एक उमेदवार दिल्याने येथील निवडणुकीत रंगत पाहायला मिळते आहे. या ग्रामपंचायतीवर दहा वर्षांपासून विखे गटाचे वर्चस्व आहे.

शिबलापूर ग्रामपंचायतीच्या ११ जागांकरिता २२ उमेदवार रिंगणात आहेत. २०१०च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही ग्रामपंचायत थोरात गटाकडे गेली, परंंतु २०१५ला पुन्हा विखे गटाने ती ताब्यात घेतली. त्यामुळे आता येथील राजकारण चांगलेच तापले आहे. उर्वरित १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही थोरात विरुद्ध विखे हे दोन गट एकमेकांसमोर असून, गावागावांतील या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. संगमनेर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपैकी आश्वी भागातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळते आहे.

चौकट

थोरात-विखेंचे फोटो एकाच फ्लेक्सवर

खळी ग्रामपंचायीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गावच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध होण्याकरिता ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यामुळे येथील ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या. येथे थोरात व विखे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते ग्रामविकास पॅनलखाली एकत्र आले. प्रचाराच्या एकाच फ्लेक्सवर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांचे फोटो शेजारी शेजारी आहेत. येथे चार जागांसाठी ग्रामविकास व परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक होत आहे.

Web Title: At the village level, the reputation of Thorat-Vikhen activists was tarnished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.