मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:23 IST2016-05-23T23:14:05+5:302016-05-23T23:23:34+5:30
अहमदनगर : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे मुकुंदनगरमधील तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

मोकाट कुत्र्यांनी घेतला तरुणाचा बळी
अहमदनगर : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे मुकुंदनगरमधील तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरली असून कुत्रे पकडण्याची यंत्रणाही फक्त कागदोपत्रीच असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
आरबाज खान सय्यद खान (वय १५, रा. नॅशनल कॉलनी, फकिरवाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरबाज याने नुकतीच दहावीची परीक्षा दिला आहे. चुलत भावासोबत तो रात्री घरी जात होता. इस्लामिया मशिदीसमोर मोकाट कुत्रे त्याच्या पाठीमागे लागले. दहा-पंधरा कुत्र्यांचा घोळका पाठीमागे लागल्याने घाबरलेल्या अवस्थेत तो पळत सुटला. कुत्रे मागे लागल्याने भेदरलेल्या आरबाज याचा श्वासोच्छश्वास एकदम बंद पडला. त्यामुळे तेथेच तो रस्त्यावर पडला. पाठीमागून येणाऱ्या चुलतभावांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपारासाठी दाखल केले. मात्र श्वास बंद पडल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भिंगार पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आरबाजचे वडील शहरात रिक्षा चालक आहेत. त्याचा मोठा भाऊ प्लंबिंगचे काम करतो तर लहान भाऊ मतिमंद असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. लहान मुलांना एकट्याला घराबाहेर सोडण्याची भीती महिलांना असते. आगरकर मळा परिसरातील मोकाट कुत्रे,जनावरांचे वृत्त गत आठवड्यातच ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. मुकुंदनगरमध्ये प्रवेश करताच मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. महापालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. मात्र त्याची यंत्रणा तोकडी असल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.
(प्रतिनिधी)