बिनविरोधसाठी एकमत
By Admin | Updated: May 23, 2016 23:24 IST2016-05-23T23:16:59+5:302016-05-23T23:24:18+5:30
राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पुढाकार घेतला असून,

बिनविरोधसाठी एकमत
राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पुढाकार घेतला असून, सोमवारी नगर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यास एकमत झाले. दरम्यान, बैठकीला डॉ. सुजय विखे अनुपस्थित राहिल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही. त्यामुळे पुन्हा २६ मे रोजी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून विक्रमी पाचशेच्या वर अर्जही दाखल झाले आहेत. परंतु कारखान्याची सर्व स्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेच सर्वांचे मत आहे.
त्यासाठी कर्डिले यांनी पुढाकार घेतला असून, राहुरीत याआधी एक बैठकही झाली. त्यानंतर पुन्हा नगर येथे शासकीय विश्रामगृहावर सोमवारी दुपारी सर्वपक्षीयांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार जनसेवा मंडळाचे अरूण तनपुरे, शेतकरी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गाडे, राष्ट्रवादी काँगे्रसचे सुधाकर तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी बैठकीला हजेरी लावली़
राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला तनपुरे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वजण घेतील तो निर्णय मान्य राहील असे सभापती अरूण तनपुरे यांनी सांगितले. उपस्थित सर्व नेत्यांचे बिनविरोधवर एकमत झाले.
परंतु काहीजण अनुपस्थित असल्याने पुन्हा दि. २६ रोजी बैठक होणार आहे. त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेऊ, असे कर्डिले यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)