अपघातात दोन युवक ठार, कर्जत-मिरजगाव रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 16:54 IST2021-02-19T16:53:51+5:302021-02-19T16:54:24+5:30
मोटारसायकल अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना कर्जत-मिरजगाव रोडवर पठारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडली.

अपघातात दोन युवक ठार, कर्जत-मिरजगाव रोडवरील घटना
कर्जत : मोटारसायकल अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना कर्जत-मिरजगाव रोडवर पठारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी घडली.
अशोक शहाजी निंबाळकर (वय ३५, रा.बहिरोबावाडी), सुरज वैभव कुलथे ( वय २२, रा. राशीन) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
अशोक निंबाळकर हा गुरुवारी सायंकाळी घराजवळील रस्ता पार करून त्यांच्या शेतात पायी चालला होता. तर सुरज कुलथे हा मोटारसायकलवर मिरजगाव येथून कर्जतकडे येत होता. मोटारसायकलवरील सुरज कुलथे याचा ताब सुटल्याने त्याने पायी जाणा-या अशोक निंबाळकर याला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये अशोकच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच सुरज कुलथे हाही जबर जखमी झाला.
या दोन्ही जखमी युवकांना नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. अशोक निंबाळकर याचे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच निधन झाले. तर सुरज कुलथे यास उपचारसाठी नगर येथे नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले.