दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना अटक; सात जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:18 IST2020-02-12T15:18:17+5:302020-02-12T15:18:55+5:30
वेळापूर ते चासनळी रस्त्यावरील ब्राम्हणनाल्याजवळ बुधवारी (दि.१२) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. यात २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून सात दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना अटक; सात जण फरार
कोपरगाव : तालुक्यातील वेळापूर ते चासनळी रस्त्यावरील ब्राम्हणनाल्याजवळ बुधवारी (दि.१२) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. यात २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून सात दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
याप्रकारणी पोलीस हवालदार दिगंबर रतन कोळी यांच्या फिर्यादीवरून भुरज्या उर्फ अर्जुन गोपाल पिंपळे (वय २०), जानू उर्फ अनिल ओपींन पिंपळे, संतोष मुन्शी चव्हाण, शरद ओपीन पिंपळे, तोलाराम उर्फ राजू विठ्ठल पिंपळे, बाबू बाबडी पिंपळे, ताईमाई ताराचंद काळे (सर्व रा.मोतीनगर, सुरेगाव ता.कोपरगाव), शरद गोटीराम फुलारे (वय २२, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव), किरण छगन सोनवणे (रा. दत्तनगर, कोपरगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींकडून तीन विना नंबरच्या दुचाकीसह लोखंडी कोयता, लाकडी दांडा, मिरची पावडर व दोरी असा एकूण ६० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार संजय पवार, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के, अशोक आंधळे, प्रदीप काशीद, चंद्रकांत तोर्वेकर, सूर्यकांत पवार, अर्जुन बाबर, भगवान ढाका, पोलीस नाईक अशोक शिंदे, असीर सय्यद, बाळासाहेब धोंगडे, दीपक ढाकरे, किशोर कुळधर, जहिर शेख, दिगंबर कोळी यांच्या पथकाचा समावेश होता. बुधवारी अटकेतील आरोपीना कोपरगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.