धान्यात टिकवण्यासाठी बापाने फवारली कीडनाशक पावडर; वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:34 IST2025-09-29T20:32:04+5:302025-09-29T20:34:04+5:30
अहिल्यानगरमध्ये धान्यात कीडनाशक पावडर टाकल्यामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला.

धान्यात टिकवण्यासाठी बापाने फवारली कीडनाशक पावडर; वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ढोकी येथील धरम वस्तीवर धान्य टिकवण्यासाठी लावलेल्या पावडरच्या वायू गळतीने दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षद विठ्ठल धरम (५ महिने) व नैतिक विठ्ठल धरम (५ वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेत त्यांची आई सोनाली विठ्ठल धरम या वासाने बेशुद्ध पडल्या असून, अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी ही भयानक घटना घडली.
चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस निरीक्षक समीर बारवकर आदींनी घटनास्थळी भेट देत नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेअंती तोडगा काढल्यानंतर संध्याकाळी दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ढोकी येथील धरम वस्तीवरील विठ्ठल धरम यांनी बाजरीला कीड लागू नये, म्हणून 'सेलफॉस' पावडर गुरुवारी रात्री पोत्यात ठेवली. शुक्रवारपासून या कुटुंबातील हर्षद व नैतिक या दोन्ही मुलांसह आईला मळमळ व उलट्यांचा त्रास व्हायला लागला. रविवारी पहाटे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
धान्याला कीड लागू नये, यासाठी सेलफॉस पावडर वापरली जाते. ही पावडर अतिविषारी असून अल्युमिनियम फॉस्पेट हा घटक असल्याने वापर झाल्यानंतर त्याचा रासायनिक गॅस तयार होतो. या पावडरीवर बंदी नाही. ती कशी वापरायची, यासंदर्भातील सूचना पाकीटावर दिल्या आहेत, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
धान्याला कीड लागू नये, म्हणून 'सेलफॉस' नावाची पावडर लावली होती. विशेष म्हणजे, या पावडर बंदी असतानाही तिची विक्री केली जात असल्याचा आरोप ढोकी ग्रामस्थ व नातेवाइकांनी केला. ही पावडर अति विषारी असल्याने मध्यंतरी तिच्यावर बंदी घातली होती, तरीही त्याची विक्री करण्यात आल्याने चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
चिमुकल्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेहासह भर पावसात एक तास टाकळी ढोकेश्वर येथील कृषिसेवा केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही देत, हे आंदोलन मागे घेण्यात आले.