कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी बाराच कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:21+5:302021-04-19T04:19:21+5:30
अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अवघ्या बारा कर्मचाऱ्यांचीच ...

कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी बाराच कर्मचारी
अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अवघ्या बारा कर्मचाऱ्यांचीच नेमणूक केली असून, हे पथक एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाईपर्यंत बराच वेळ जातो. एकदा आलेले पथक पुन्हा येत नाही, हे पाहून दुकानदार शटर बंद करून दुकाने सुरूच ठेवत असल्याचा प्रकार सावेडीत पाहायला मिळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे रविवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. शहराची जबाबदारी महापालिकेवर आहे. भरारी पथके स्थापन केल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १२ कर्मचाऱ्यांची चारच पथके महापालिकेकडून स्थापन केली आहेत. शहराचे क्षेत्रफळ पाहता हे कर्मचारी कमी पडतात. शहरात दुकानांची संख्याही मोठी आहे. त्यात आता दुकानांसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आली. मात्र दुपारी ११ नंतर अनेक दुकाने उघडी असतात. शटर बंद करून दुकाने सुरू असून, ग्राहक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावर कुणाचा अंकुश नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरासह केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, सारसनगर, बुरुडगाव, नालेगाव, नेप्तीनाका, कल्याण रोड, बालिकाश्रम रोड, तपाेवन रोड भागात दुकाने, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंप, मेडिकल आदी दुकानांची संख्या मोठी आहे. परंतु, त्या तुलनेत कर्मचारी कमी असल्याने नियमांचे पालन होणार कसे, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.
....
शटर बंद करून विक्री सुरू
दुकानांना सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु, दुकानांचे शटर बंद करून विक्री सुरू असून, पथकाला दुकानांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने पथकांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.