राशीनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:50 IST2018-06-04T16:49:24+5:302018-06-04T16:50:04+5:30
राशीन येथील एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रयत्न फसला.

राशीनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न
राशीन : येथील एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रयत्न फसला.
राशीनमधील कर्जत-बारामती महामार्गावर युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी ही शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेचे शटर व लोखंडी दरवाजा टणक वस्तुने उचकटून बँकेच्या आत प्रवेश करण्यात यश मिळविले. परंतु तिजोरीपर्यंत जाता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.
या घटनेची माहिती मिळताच राशीन पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार वैभव महांगरे, पोलीस काँस्टेबल, तुळशीदास सातपुते, गणेश ठोंबरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. बँकेच्या शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फडक्याने चेहरा गुंडाळलेले दोन चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले.
रविवार असल्याने बँक बंद होती. सोमवारी बँकेची शाखा नियमित कामकाजासाठी उघडण्याअगोदर ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील अंगुलीमुद्रा शाखेचे ठसे तज्ज्ञ ए. एस. भिसे, पोलीस कॉँस्टेबल अशोक गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. चोरट्यांचा कोणताही माग पोलिसांना सापडला नाही.