आघाडीच्या तिघांवर सेनेची मदार
By Admin | Updated: May 22, 2016 00:18 IST2016-05-22T00:16:09+5:302016-05-22T00:18:26+5:30
अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली आतापासूनच वेगवान झाल्या असून आघाडीच्या तीन नाराज नगरसेवकांवर सेनेची मदार कायम आहे.

आघाडीच्या तिघांवर सेनेची मदार
अहमदनगर : महिनाभरानंतर होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या हालचाली आतापासूनच वेगवान झाल्या असून आघाडीच्या तीन नाराज नगरसेवकांवर सेनेची मदार कायम आहे. सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी गुप्त बैठकांना वेग आला आहे. युती व आघाडीकडून अजूनपर्यंत तरी महापौर पदी कोण? याची निश्चिती झालेली नाही.
महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ जूनअखेर संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच नवीन महापौर पदाची निवडणूक होणार आहे. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने महापालिकेवर भगवा फडकवायचा, असा चंग सेनेने बांधला आहे. सेनेकडे सुनीता भगवान फुलसौंदर, अनिता राजेंद्र राठोड, सुरेखा संभाजी कदम हे महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यादृष्टीने कदम, फुलसौंदर, राठोड, अनिल शिंदे हे नगरसेवकांची जुळवाजुळव करीत आहेत़ जून २०१५ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे, कॉँग्रेसचे संजय लोंढे, मुद्दसर शेख सेनेच्या गळाला लागले होते. महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहून तिघांनी सेनेला मदत केली होती. आताही या तिघांवरच सेनेची मदार आहे. किशोर डागवाले, पोटनिवडणुकीत योगीराज गाडे यांची वाढलेली एक जागा आणि सेनेचे १८ अशा वीस नगरसेवक सेनेकडे आहे. अपक्ष नगरसेविका उषा शरद ठाणगे या सेनेच्या गोटात गणल्या जात आहेत. भाजपचे ९ आणि आघाडीचे ३ नाराज असे ३३ नगरसेवक सेनेकडे होते. त्याच जोरावर सेनेकडून महापौर पदासाठी कस लावला जात आहे.
आघाडीकडून कॉँग्रेसच्या उपमहापौर सुवर्णा कोतकर, राष्ट्रवादीच्या नीता घुले, आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप या तिघांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. (प्रतिनिधी)
मनसेला सांभाळण्याची कसरत
सार्वत्रिक निवडणुकीपासून मनसे राष्ट्रवादीसोबत आहे. स्थायी समितीचे सभापतीपद मनसेला पाच वर्षे दिले जाईल, असा शब्द राष्ट्रवादीने मनसला दिला आहे़ किशोर डागवाले यांनी सभापतीपद भोगल्यानंतर सेनेत प्रवेश केला आहे. दुसरे नगरसेवक गणेश भोसले यांनीही सभापती पद भोगले आहे. स्थायी समिती अर्धवट असल्याने अजूनही भोसले हेच सभापती आहेत. सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा यांना सभापती पदाची आस आहे. मात्र, महापौर पदाच्या निवडणुकीनंतरच सभापती पदाची निवडणूक होणार असल्याने जाधव, बोज्जा यांना सांभाळण्याची कसरत आघाडीला करावी लागणार आहे. कारण सेनेकडूनही या दोघांना सभापती पदाची ‘आॅफर’ आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
असे आहे संख्याबळ
शहर विकास आघाडी २१ (राष्ट्रवादी १७ व ४ अपक्ष)
कॉँग्रेस ११
सेना २० (डागवालेंसह)
भाजप ९
अपक्ष ४
मनसे ३
मातोश्रीवरुन ठरणार सेनेचा उमेदवार
सेनेचा उमेदवार मातोश्रीवरून निश्चित होणार आहे. भाजपमध्येही उपमहापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
भाजपच्या सहा नगरसेवकांना उपमहापौर पदाचे डोहाळे लागले आहेत. आघाडीचा उमेदवार स्थानिक पातळीवरच निश्चित होणार आहे.
जगताप-कळमकर हे दोघे उमेदवार निश्चित करून पक्षश्रेष्ठींना कळवतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मे अखेरीस युती व आघाडीचे महापौर पदाचे उमेदवार निश्चित झालेले असतील, असे सूत्रांनी सांगितले.