पूजा साहित्य विक्रेत्यांवर शेतमजुरीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:38+5:302021-06-05T04:15:38+5:30
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील सोनई (बेल्हेकरवाडी) येथील रेणुका मातेचे काच मंदिर गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद आहे. ...

पूजा साहित्य विक्रेत्यांवर शेतमजुरीची वेळ
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील सोनई (बेल्हेकरवाडी) येथील रेणुका मातेचे काच मंदिर गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद आहे. लॉकडाऊनमुळे मंदिराजवळी फुलहार, पूजा साहित्य विकणाऱ्या छाेट्या व्यावसायिकांवर शेतमजुरी करण्याची वेळ आली आहे.
मागच्या वर्षी कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा देशभरात लॉकडाऊन केले होते. तेव्हापासूनच मंदिरे, फुलहारांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने बंद आहेत. एक वर्षांपासून दुकान बंद असल्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही. काही व्यावसायिक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करत आहेत. काही व्यावसायिक अजूनही घरीच बसून आहेत.
काही व्यावसायिकांकडे वेगवेगळ्या कारणासाठी घेतलेले बँकांचे कर्जत आहे. त्याचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जसे मागील लॉकडाऊनमध्ये केले, तसे काही दिवस सध्याही कर्जाचे हप्तेही शासनाने बंद करावेत, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.
-----------
लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने शेतातच काम करतो. काही व्यावसायिक मात्र इतरांच्या शेतात काम करत आहेत. कोरोनामुळे अर्थिकचक्र ठप्प आहे. काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना लवकर संपून मंदिरे व दुकाने उघडावीत, अशी अपेक्षा आहे.
- सुभाष कुरकुटे, व्यावसायिक, बेल्हेकरवाडी
-------
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवली आहेत. फक्त पूजाविधीसाठीच आम्ही मंदिरे उघडतो.
- ज्ञानेश्वर जोशी, पुजारी, रेणुकामाता मंदिर
------
०४ रेणुका माता मंदिर
सोनई येथील वर्षभरापासून बंद असलेल्या रेणुकामाता मंदिर परिसरातील शुकशुकाट.