‘तिळगूळ हे निमित्त, मतदानावरच सारे चित्त!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:56+5:302021-01-15T04:18:56+5:30
पिंपळगाव माळवी : सध्या नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. ...

‘तिळगूळ हे निमित्त, मतदानावरच सारे चित्त!’
पिंपळगाव माळवी : सध्या नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. परंतु, मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून पिंपळगाव माळवी येथील सर्वच ग्रामपंचायत उमेदवार तिळगूळ घेण्याच्या निमित्ताने मतदारांशी घरोघरी संपर्क करत आहेत.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून सर्व उमेदवार सकाळपासूनच दारोदार फिरत आहेत. महिला उमेदवार असल्यास महिलांशी संपर्क साधण्यास अडचण येत नाहीत. मात्र पुरुष उमेदवारांनी यासाठी पत्नींकडे महिला मतदारांशी संपर्क करण्याची सूत्रे दिली आहेत. यावर्षी प्रथमच मतदान आणि मकर संक्रांती हा योग जुळून आला आहे. तिळगूळ देण्या-घेण्याचे हे फक्त निमित्त आहे. परंतु, सारे लक्ष मतदानावर आहे. एरवी कधीही एकमेकांना न विचारणारे उमेदवारसुद्धा तिळगूळ घेण्यासाठी मतदारराजाचे उंबरठे झिजवत आहेत. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये पिंपळगाव माळवीत जनसेवा पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल अशी ‘काँटे की टक्कर’ होत असून, दोन्हीही पॅनेल मतदारांच्या गाठीभेटी घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. बाहेरगावी असलेल्या मतदारांना दररोज मोबाईलवर संपर्क करून त्यांना मतदानास येण्यासाठी मनधरणी करत आहेत.