एकाच विहिरीत आढळले तिघांचे मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:25 IST2016-05-23T23:20:59+5:302016-05-23T23:25:53+5:30
कोपरगाव(अहमदनगर) : तालुक्यातील अंचलगाव शिवारात कोरड्या विहिरीत दोन महिला व एका पुरूषाचे मृतदेह आढळून आले़ चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा,

एकाच विहिरीत आढळले तिघांचे मृतदेह
कोपरगाव(अहमदनगर) : तालुक्यातील अंचलगाव शिवारात कोरड्या विहिरीत दोन महिला व एका पुरूषाचे मृतदेह आढळून आले़ चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता मृतदेहाच्या अवस्थेवरून व्यक्त केली जात होती़ मृतांची ओळख सायंकाळी उशिरापर्यंत पटलेली नव्हती़ कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव शिवारातील गट नंबर ७९ मध्ये किसन कारभारी राजगुरू यांचे शेत आहे़ शेत जमिनीत विहीर असून ती कोरडी पडलेली आहे़ सोमवारी दुपारी मेंढपाळाला दुर्गंधी आली़ त्याने विहिरीत डोकावले असता, तीन मृतदेह असल्याचे दिसून आले़ त्याने तत्काळ रामनाथ शंकर शिंदे व पोलीस पाटील दादासाहेब शिंदे यांनी घटनेची माहिती दिली़ त्यानंतर पोलीस पाटील शिंदे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांना खबर दिली़ पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद काशिद, आरक़े ़ धिवर, बाबा सांगळे, सुरेश पवार, गोपीनाथ गोर्डे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तीन मृतदेह विहिरीतून बाहेर काढले़ मृतांमध्ये दोन महिला व एका पुरूषाचा समावेश आहे़ तिघेही तीस ते चाळीस वयोगटातील असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ मृतदेह एवढे कुजलेल्या अवस्थेत होते, की त्यांची ओळख पटणे शक्य नाही़ चार-पाच दिवसांपूर्वीच ही घटना घडलेली असावी़ तिघांचाही पेहराव पाहता ते चांगल्या कुटुंबातील असावेत़ त्यांनी येथे येऊन आत्महत्या केली, की इतरांनी त्यांचा खून करून अंचलगाव शिवारातील विहिरीत आणून टाकले असावे, याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी सांगितले़ पोलीस पाटील दादासाहेब शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ शवविच्छेदनाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ (प्रतिनिधी)