रांगेत राहणाऱ्यांनाच लस नाही, तर घरी कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:03+5:302021-07-27T04:22:03+5:30
--------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात रांगेत उभे राहणाऱ्यांना लस मिळत नाही. पहिल्या डोसचे ८७ दिवस पूर्ण झाले ...

रांगेत राहणाऱ्यांनाच लस नाही, तर घरी कधी मिळणार ?
---------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात रांगेत उभे राहणाऱ्यांना लस मिळत नाही. पहिल्या डोसचे ८७ दिवस पूर्ण झाले तरी अनेकांना दुसरी लस मिळाली नाही. अशा स्थितीत बेडवरून उठता येत नाही, अशांना घरी येऊन लसीकरण करणे नगर जिल्ह्यात सध्या तरी अशक्य दिसते आहे. त्यामुळे शासनाने याबाबत आदेश दिले असले तरी अद्याप जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे अशी कोणतीही तयारी झाली नसल्याचे दिसून आले आहे.
जे लोक अंथरुणाला खिळून आहेत, ज्यांना बेडवरून उठता येत नाही, अशा लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर येण्याची गरज नाही, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत. अशा नागरिकांना आरोग्य विभागाकडून घरी जाऊन लस देण्याचे नियोजन करण्याबाबत स्थानिक पातळीवर मात्र कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. बेडवर असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे बेडवर असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात दरदिवशी सरासरी ३ ते ७ हजारपर्यंत नागरिकांना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला अद्याप अपेक्षेप्रमाणे कोरोना लसीचे डोस मिळालेले नाहीत. तीन दिवसाला २० ते २५ हजार लसीचे डोस मिळतात. हा आकडा लाभार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. आरोग्य केंद्रावर आलेल्या नागरिकांना आल्या मार्गानेच लस न घेता परत जावे लागत आहे. लसीकरणाची एकूणच गती मंदावली आहे. ११ लाख ७३ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ८ लाख ७५ हजार नागरिकांना पहिला, तर २ लाख ९८ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळालेला आहे. म्हणजे ५० लाख लोकसंख्येमध्ये केवळ ८ टक्केच नागरिकांचेच दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. असे असताना आता शासनाने हायरिस्क लोकांना घरी जाऊन लस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून अद्याप कोणतेही नियोजन सुरू नसल्याचे दिसत आहे. बेडवर किती नागरिक आहेत, याचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे, मात्र, ते कधी सुरू होणार, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती नव्हती.
-------------
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस-८,७५,४५२
दुसरा डोस-२,९८,५२२
---------------
६० पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस-२,८१,३००
दुसरा डोस-१,२२,३०६
---------------
एकूण लसीकरण-११,७३,९७४
--------------
लसीकरणासाठी स्वतंत्र नियोजन
शासनाच्या निर्देशाप्रमाणे अंथरुणाला खिळून असलेल्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. त्यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासन नियोजन करणार आहे. आठ दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. पुणे, मुंबईत अशा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
-------------
हायरिस्कमध्ये कोण?
जे लोक केवळ बेडवर आहेत. ज्यांना घराबाहेर पडणे अशक्य आहे अशांनाच घरी जाऊन लस दिली जाणार आहे. अपघात किंवा विविध आजारांमुळे अनेक नागरिक बेडवर पडून असतात. त्यांची सेवा-शुश्रूषा घरी केली जाते, अशा व्यक्तींचा या हायरिस्क व्यक्तींमध्ये समावेश आहे.
-------------