‘त्या’ मृतांची ओळख पटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:43 IST2016-05-24T23:21:12+5:302016-05-24T23:43:23+5:30
कोपरगाव : तालुक्यातील अंचलगाव शिवारातील कोरड्या विहिरीत आढळलेल्या तीनही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.

‘त्या’ मृतांची ओळख पटेना
कोपरगाव : तालुक्यातील अंचलगाव शिवारातील कोरड्या विहिरीत आढळलेल्या तीनही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. शवविच्छेदन अहवालही पोलिसांना बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेला नव्हता़ त्यामुळे राज्याच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींबाबत कुठे तक्रार दाखल आहे का? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत़
कोपरगावातील अंचलगाव शिवारात सोमवारी पोलिसांना किसन राजगुरू यांच्या शेतातील विहिरीत दोन महिला व एका पुरूषाचा मृतदेह मिळून आला़ मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होते़ त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे. मयतांचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात आले़ सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला नव्हता़ मयत एका महिलेच्या अंगात लाल रंगाचा तर दुसरीच्या अंगात हिरवट रंगाचा पंजाबी ड्रेस आहे़ तरूणाच्या अंगात निळ्या रंगाची जीन्स पँट व चौकडा शर्ट आहे़
एका महिलेच्या तोंडावर जखमाही आढळून आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी दिली़ तीनही मयतांच्याजवळ कुठलीच कागदपत्रे अथवा पर्स, पाकीट काहीही मिळून आले नाही़ त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे़
आता इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाच-सहा दिवसांत कुठे व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत़ या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत, असेही शहाजी नरसुडे यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)