थोरातांचा ऐतिहासिक विजय

By Admin | Updated: October 20, 2014 10:50 IST2014-10-20T10:50:11+5:302014-10-20T10:50:11+5:30

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवून इतिहास रचला.

Thoratan's historic conquest | थोरातांचा ऐतिहासिक विजय

थोरातांचा ऐतिहासिक विजय

 
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवून इतिहास रचला. मात्र, विजयाची घोडदौड कायम ठेवताना वाढलेला विरोधी मतांचा टक्काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे.
 
विश्लेषण
 
दूरचित्रवाणी कक्षाकडे निरीक्षकांची पाठ
राज्यातील निकाल पाहण्यासाठी निवडणूक निरीक्षकांसाठी उभारलेल्या कक्षात दूरचित्रवाणी संच ठेवण्यात आला होता. मात्र निवडणूक निरीक्षक या कक्षाकडे फिरकलेच नाहीत. तर कक्षामध्ये पोलीस अधिकारी व इतर कर्मचारी बसून बातम्या पाहत होते. क्रीडासंकुलाच्या मैदानावर एल.ई.डी. वर निकाल बघण्याची सुविधा करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी एल.ई.डी.वर निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी तुरळक दिसत होती. 
मतमोजणीचा घोळ आणि थोरातांचा विजय
अंतिम निकालानंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस) हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र प्रदान केल्यावर उमेदवारनिहाय मतांच्या अंतिम आकडेवारीची जुळवाजुळव सुरु झाली. १९ व्या फेरीच्या मतमोजणीचा घोळ मात्र संपत नव्हता. त्यामुळे १९ व्या फेरीचा अधिकृत निकाल देण्यास निचीत यांनी असर्मथता दर्शविल्याने सर्वजण अवाक् झाले.पुन्हा पाच मिनिटांनी २ मतदान यंत्राची बेरीज राहील्याचे कारण देत नव्याने मोजणी झाली. कासव गतीने सुरू असलेली मतमोजणी पूर्ण होण्यास साडे सहा तासांचा अवधी लागला. विरोधकांचे आस्ते कदम
संगमनेर विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय उर्फ बाळासाहेब थोरात यांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली. पण, त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. तर विरोधी मतांचा टक्का मात्र कमालीचा वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही निवडणूक काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करणारी ठरली. १९८४ साली अपक्ष म्हणून निवडून आलेले थोरात हे नंतर काँग्रेसवासी झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ६ निवडणुका जिंकत राज्य मंत्रीमंडळात पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, रोहयो, शालेय शिक्षण, राजशिष्टाचार व महसूल अशा विविध खात्यांचा कारभार पाहिला. शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून एकदाही विरोधी उमेदवार निवडून येवू शकला नाही. विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची परंपरा थोरातांनी कायम राखली. परंतु त्याचबरोबर विरोधी मतांमध्येही लक्षणीय वाढ होत गेली. थोरात यांनी राज्यात दबदबा निर्माण करीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले. यंदाच्या निवडणुकीत थोरात यांच्यापुढे जनार्दन आहेर (शिवसेना), राजेश चौधरी (भाजपा) व आबासाहेब थोरात (राष्ट्रवादी) या प्रमुख उमेदवारांचे आव्हान होते. शिवसेनेचे आहेर हे प्रबळ उमेदवार मानले जात होते. मात्र, आहेर हे नवखे व अनुभवशून्य असल्याने थोरात हे किमान १ लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, अशी खात्री काँग्रेस नेते व कार्यकर्ते देत होते. थोरातांच्या तुलनेत आहेर यांची प्रचार यंत्रणा तोकडी होती. भाजपाचे चौधरी, राष्ट्रवादीचे थोरात यांच्यासह आहेर हेही प्रचारात कमी पडले. प्रचारात गती घेण्यास एकाही विरोधी उमेदवाराला शक्य झाले नाही. विरोधकांचे आस्ते कदम बाळासाहेब थोरात यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते. थोरात यांना १ लाख ३ हजार ५६४ तर आहेर यांना ४४ हजार ७५९ मते पडली. भाजपाचे चौधरी यांना २५ हजार ७ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे थोरात यांना केवळ २ हजार ६५0 मतांवरच समाधान मानावे लागले. यावरून तालुक्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व सिद्ध झाले. मागील निवडणुकीत थोरात यांना ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हा सेना-भाजप युतीचे बाबासाहेब कुटे यांना ४५ हजार मते पडली होती. आता स्वबळावर लढणार्‍या आहेर (सेना) व चौधरी (भाजपा) या दोघांच्या मतांची बेरीज केली तर ती ६९ हजार ७६६ इतकी होते. म्हणजेच विरोधकांची ताकद चांगलीच वाढल्याचे दिसते. तर थोरात यांच्या मताधिक्यात मात्र केवळ ३ हजार ८0५ मतांची भर पडली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवून इतिहास रचला. मात्र, विजयाची घोडदौड कायम ठेवताना वाढलेला विरोधी मतांचा टक्काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे. 
विश्लेषण - रियाज सय्यद
 

 

Web Title: Thoratan's historic conquest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.