थोरांचे समर्पण नव्या पिढीला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:44+5:302021-09-12T04:24:44+5:30
अहमदनगर : शहरासाठी ज्यांनी समर्पण भावनेने काम केले, जे आपल्या कतृत्वाने मोठे झाले, त्यांची आठवण नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ...

थोरांचे समर्पण नव्या पिढीला प्रेरणादायी
अहमदनगर : शहरासाठी ज्यांनी समर्पण भावनेने काम केले, जे आपल्या कतृत्वाने मोठे झाले, त्यांची आठवण नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. रसिक ग्रुपने नील फलक लावून शहराच्या वैभवात भर घातली. तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान केला, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
माजी आमदार स्व. डॉ. श्रीकृष्ण निसळ यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यसैनिक स्व. जानकी कवडे, स्व. बी. यू. खान, स्व. एकनाथराव शिंदे यांनीही देश व शहरासाठी समर्पण दिले आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत रसिक ग्रुपने त्यांच्या निवासस्थानावर नील फलक लावले आहेत. या फलकांचे अनावरण आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ साहित्यिक अनिल सहस्त्रबुद्धे, नगरसेविका सोनाली चितळे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, अभिनेते मोहनीराज गटणे, श्रीनिवास बोज्जा, ज्ञानदेव पांडुळे, अजय चितळे, संजय झिंजे आदींसह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी रसिक ग्रुपच्या वतीने प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी सनई-चौघड्याच्या सुरात व दारात सुंदर रांगोळी रेखाटून सर्वांचे स्वागत करण्यात आले.
आ. जगताप पुढे म्हणाले, स्व. श्रीकृष्ण निसळ यांनी आमदार असताना शहरवासीयांची गरज ओळखून पाण्याची योजना मंजूर केली. या कामाची प्रेरणा घेत मीपण शहरासाठी मुळा धरणापासून आणखी एक नव्या पाइपलाइनचे काम केले आहे. ते काम ९० टक्के काम झाले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, एखाद्या शहरात समाजासाठी आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींविषयी नवीन पिढी जर सन्मानाने प्रेम व आदरभाव व्यक्त करीत असतील तर ही गोष्ट शहराच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने अशा गौरवशाली व्यक्तींच्या निवासस्थानी नील फलक लावून सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी कवडे, डॉ. निसळ, खान व शिंदे कुटुंबीयांच्या वतीने प्रतिभा वाळके, शैलजा निसळ, गिरीश निसळ, अन्वर खान व रऊफ शेख, डॉ. जयवंत शिंदे, यशवंत शिंदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
----
फोटो- ११नील फलक
रसिक ग्रुपच्या वतीने नगर शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या निवासस्थानावर नील फलक लावले. यावेळी आमदार संग्राम जगताप, अविनाथ घुले, किशोर डागवाले, जयंत येलूलकर, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, श्रीनिवास बोज्जा, मोहिनीराज गटणे आदी.