तीनशे मुला-मुलींचे सैराट झालं जी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:33 IST2016-06-05T23:28:46+5:302016-06-05T23:33:28+5:30
सुदाम देशमुख, अहमदनगर काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.

तीनशे मुला-मुलींचे सैराट झालं जी !
सुदाम देशमुख, अहमदनगर
आधी बेपत्ता म्हणून तक्रार... नंतर अपहरणाचा गुन्हा.... काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. दोन वर्षात तीनशेपेक्षा जास्त मुला-मुलींनी पळवून जाऊन लग्न केले आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर महिनाभरातच मुले विवाह करून घरी येत आहेत. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे सैराट प्रेम मात्र पालकांची डोकेदुखी ठरली आहे.
सैराट चित्रपटाने सध्या प्रत्येकाला याड लावलं आहे. सैराटमधील प्रेमकथा गावोगावी बघायला मिळते आहे. शहरात त्याचे प्रमाण जास्त आहे. कॉलेजमध्ये शिकायला जाणारी मुले-मुली ओळखीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. त्यांच्या प्रेमाची वार्ता घरातील मंडळी, नातेवाईक यांना कळाल्यानंतर मुले घरातून पळून जात आहेत. मुला-मुलींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांना अशा घटनांमुळे धक्काच बसतो आहे. मुलगी पळून गेल्यानंतर हातावर हात ठेवून बसणे नको म्हणून मुलीचे पालक पोलीस ठाण्यात आधी बेपत्ता झाल्याची तक्रार देतात. तीन दिवसानंतर मुलगी मिळाली नाही, तर पालकांच्या हट्टापायी पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो. तब्बल महिना किंवा दोन महिन्यांनी मुले सापडतात किंवा थेट लग्न करून पोलीस ठाण्यात हजर होतात. मात्र त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते आणि पालक त्यावेळी हतबल झालेले असतात. जातीमधील मुलगा असेल तर संमती देवून लग्नही उरकून टाकले जाते. मात्र जातीबाहेर लग्न झाल्यास त्यांचे पालक मुला-मुलींशी कायमचे संबंध तोडून टाकत असल्याचे वास्तव या घटनांमधून समोर आले आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ३१० मुले-मुली पळून गेले आहेत. मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. मुलांच्या अपहरणामागे लग्नाशिवाय अन्य कारणे आहेत. मात्र मुलींच्या अपहरणाच्या घटनामांगे केवळ प्रेम प्रकरणाशिवाय दुसरे कारण नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घरातील वातावरण मुलांसाठी पोषक नसते. घरात मुलांना प्रेम, जिव्हाळा मिळाला नाही की मुले समवयस्कांमध्ये प्रेम शोधतात. यंग जनरेशन एकत्र येते. मुले काल्पनिक जगात वावरतात. रोमँटिक होतात. एंजॉय एवढेच त्यांचे ध्येय बनते. त्यातून लग्नापर्यंत मजल जाते. बहुतांश प्रेम विवाह आंतरजातीय असतात. वास्तव जगात वावरताना सामाजिक-आर्थिक संघर्षातून पुन्हा घटस्फोटापर्यंत येतात. मुलांपासून तुटक राहणे-वागणे धोक्याचे आहे. मुलांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यांच्या दैनंदिन कृतीवर लक्ष असावे.
-डॉ. वसंत देसले, मानसशास्त्राचे अभ्यासक