ब्रिटनमधून नगर जिल्ह्यात आले १३ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:18 IST2020-12-25T04:18:05+5:302020-12-25T04:18:05+5:30
अहमदनगर : ब्रिटनमधून जिल्ह्यात १३ जण आले आहेत, त्यापैकी ११ जण नगर शहरातील आहेत. ११ पैकी ९ जण नगर ...

ब्रिटनमधून नगर जिल्ह्यात आले १३ जण
अहमदनगर : ब्रिटनमधून जिल्ह्यात १३ जण आले आहेत, त्यापैकी ११ जण नगर शहरातील आहेत. ११ पैकी ९ जण नगर शहरात दाखल झाले असून दोघे मुंबईत आहेत. सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. अन्य दोघे प्रवासी श्रीगोंदा व संगमनेरमधील असून ते सध्या पुणे व मुंबईत आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून ब्रिटनमधून मुंबईत दाखल झालेल्यांची यादी राज्य सरकारला प्राप्त झाली. हीच यादी जिल्हा व महापालिका प्रशासनाला गुरुवारी मिळाली. त्यामध्ये ब्रिटनमधून ७ ते २२ डिसेंबर या कालावधीत नगरला आलेल्यांची संख्या १३ असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
१३ पैकी ९ जण हे नगर शहरातील पाच वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. दोघे मुंबईत आहेत.
ब्रिटनमधून आलेल्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना जनुकीय चाचणीसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह अहवाल आल्यास रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त कक्षात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेवून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सहवासात आल्यापासून ५ ते १० दिवसांत त्यांची चाचणी करण्यात येईल. २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्यांनी स्वत: आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.
-------------
या भागातील आहेत प्रवासी
मार्केट यार्ड-२
कराचीवालानगर-४
गुलमोहोर रोड-३
पाईपलाईन रोड-१
नवनागापूर १
संगमनेर-१
श्रीगोंदा -१
-----------