गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:31:55+5:302014-07-13T00:17:36+5:30
अहमदनगर : दहावी आणि बारावीतील गुणवंतांच्या पाठीवर ‘लोकमत’ने कौतुकाची थाप दिली. गुणवंतांना पेढे भरवून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या.
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
अहमदनगर : दहावी आणि बारावीतील गुणवंतांच्या पाठीवर ‘लोकमत’ने कौतुकाची थाप दिली. गुणवंतांना पेढे भरवून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. विळदघाट येथील विखे फौंडेशनच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या सत्काराने विद्यार्थी आणि त्यांचे पालक हरखून गेले.
लोकमत युवा नेक्स्ट व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्यातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी एन. बी. धुमाळ, विखे फाऊंडेशनचे डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पी. एम. गायकवाड, डॉ. अरुण इंगळे, लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख अनंत पाटील आदी उपस्थित होते.
एन. बी. धुमाळ यांनी प्रेरणादायी आणि ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकासाचे मंत्र दिले. ते म्हणाले, करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. तरीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आपला पाल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालकांनीच मुलांचे शिक्षक झाले पाहिज. दहावीच्या परीक्षेत यश मिळविल्यानंतर मुलांना ज्या क्षेत्रात रुची असेल त्याच क्षेत्रात जाणे गरजेचे आहे.
आयबीएमआरडीचे संचालक डॉ. अरुण इंगळे म्हणाले की, मुलांना यशाचा उत्साह टिकविता आला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत स्वातंत्र्य दिले पाहिजे. तसे झाले तरच विद्यार्थ्यांचा भविष्यातील यशाचा आलेख उंचावू शकेल. वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन डॉ. विश्वास पेंडसे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल खंदारे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता पालकांचे व गुरुजनांचे ॠण व सामाजिक ॠण याचे सतत भान ठेवावे. त्यांचा आदर राखण्याचा सतत प्रयत्न करावा.
-डॉ. अशोक राऊळ,
प्राचार्य वैद्यकीय महाविद्यालय
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अगदी अविस्मरणीय क्षण आहे. कारण ही कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन नक्कीच भविष्यात उत्तुंग यश मिळवतील.
- प्रा. डॉ. पी. वाय. पवार,
प्राचार्य, कॉलेज आॅफ फार्मसी
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट असते. सोबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहे
-प्राचार्य ए. एस. पुंड,
कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चर