Rahuri Crime: बँकेत भरणा करण्यासाठी कारमधून जाणाऱ्या दोघांना अडवून लोखंडी रॉडने काचा फोडून दहशत निर्माण करीत २० लाख रुपये असलेली बॅग चार चोरट्यांनी पळविली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात घडली.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात असलेल्या माउली दूध प्लांटचे कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघेजण सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास २० लाख रुपये घेऊन कारमधून (एमएच १७ एजे ९००४) ब्राम्हणी येथील एका बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. दरम्यान ते ब्राम्हणी शिवारातील तांबे वस्ती जवळ असताना विना नंबरच्या काळ्या चारचाकीतून आलेल्या चार जणांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली. त्यावेळी चोरटे हातात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले. त्यांनी बनसोडे यांच्या कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील २० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून शनिशिंगणापूरच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हवालदार रोहिदास नवगीरे, वाल्मीक पारधी, नदिम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, लक्ष्मण खेडकर यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगर येथील ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी आले आहे.
पाळत ठेवून रक्कम लुटली
चोरटे ज्या वाहनातून आले होते ते वाहन माउली प्लांट परिसरात सुमारे अर्धा तास थांबले होते. त्यांनी पाळत ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. भरदिवसा झालेल्या या रस्ता लुटीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.