वृद्धेश्वरकडे नोंदणी झालेल्या उसाचे टिपरूही राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:11+5:302021-03-23T04:23:11+5:30
तिसगाव : नैमित्तिक कामांच्या व्यतिरिक्त कोणताही व्यत्यय यंदाच्या गळीत हंगामात आला नाही. अडीच हजार मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता ...

वृद्धेश्वरकडे नोंदणी झालेल्या उसाचे टिपरूही राहणार नाही
तिसगाव : नैमित्तिक कामांच्या व्यतिरिक्त कोणताही व्यत्यय यंदाच्या गळीत हंगामात आला नाही. अडीच हजार मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता असतानाही तीन हजारांपर्यंत प्रतिदिन सरासरी गाळप व वेगाचे सातत्य राहिले. १२१ दिवसांच्या गाळप हंगामात तीन लाख ऐंशी हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन सुमारे चार लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. वृद्धेश्वरच्या कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या उसाचे टिपरूही शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी शेतकऱ्यांना दिली.
‘लोकमत’ प्रतिनिधीने राजळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
नगदी पीक म्हणून उसाला बँकांचे मिळणारे अर्थसहाय्य, दोन वर्षांपासूनचे अनुकूल पर्जन्यमान यामुळे शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देत आहे. आडसाली, पूर्वहंगामी उसाची आवश्यकता कारखान्यास गरजेची असते. ती अपेक्षेप्रमाणे झाली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये विक्रमी ऊस लागवड झाली. या एकाच महिन्यातील लागवड झालेल्या उसापासून सव्वादोन लाखांच्यावर टनेज अपेक्षित आहे. गाळप क्षमता विचारात घेता मार्च अखेर ८५ दिवसात हा ऊस गाळप होणे अपेक्षित आहे, असे राजळे यांनी सांगितले.
उपाध्यक्ष रामकिसन काकडे म्हणाले, कासार पिंपळगाव, चितळी, टाकळीमानूर गटात ऊस लागवड चांगली आहे. तुलनेत पाथर्डी, मिरी, करंजी गटात कमी आहे. जानेवारी २०२० नंतर लागवड झालेले ऊस क्षेत्र अल्प असून यापासून किमान ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. एप्रिलच्या मध्यापर्यंत शेष ऊस गाळपाचे नियोजन संचालक मंडळ, कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
--
काही अडचणी असल्यास तक्रार करा
तोडणीसह वाहतूक यंत्रणेच्या वास्तव त्रुटी व आर्थिक मागणी संदर्भाने ऊस उत्पादकांनी लेखी तक्रारी कराव्यात. सत्यता पडताळून कठोर कारवाई करू, असे कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी सांगितले.