शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन मुलांच्या वजनात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:55+5:302021-07-08T04:14:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ...

शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन मुलांच्या वजनात झाली वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने मुलांमध्ये मैदानावर खेळायला जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. त्याचा विपरित परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असून, पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध लादले. शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. मुले कोरोना काळात घरातच आहेत. त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, संगणक, लॅपटॉप समोर तासन्तास बसून अध्ययन करावे लागत असल्याने एका जागी बैठक वाढली आहे. परिणामतः मुलांच्या वजनात वाढ झाली आहे.
अभ्यास करत असताना मुले विविध प्रकारचे फास्टफूड, जंकफूड सेवन करतात, तसेच घरात असल्याने विविध चमचमीत पदार्थ घरात होऊ लागल्यानेदेखील मुलांच्या वजनात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील मुले शाळेत येताना-जाताना त्यांचे एक-दोन किलोमीटर सहज पायी चालणे व्हायचे. शहरात अनेक मुले सायकलहून शाळेत जायची-यायची. आठवड्यातून काही दिवस शाळेत खेळाचे तास असायचे. मुले मैदानी खेळ खेळायचे; मात्र हे सर्व काही बंद झाले आहे. त्यामुळे लवकरच शाळा सुरू कराव्यात, असेही अनेक पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----------------
मुलांचे मानसिक आरोग्य काही प्रमाणात बिघडले आहे. मुले मोबाइलमध्ये मग्न असतात. ते चिडचिडे, हेकेखोर, एकलकोंडे बनले आहेत. मैदानी खेळ खेळले जात नसल्याने मुलांची चरबी वाढते आहे. त्यांना
जंकफूड, फास्टफूड देणे टाळावे. त्यांच्यासोबत खेळावे, त्यांच्याकडून योग्य पद्धतीने व्यायाम करून घ्यावा. पालकांनी मुलांचे मित्र बनावे, त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
डॉ. राजेंद्र मालपाणी, बालरोग तज्ज्ञ, संगमनेर.
-------------
अनेक आजार जडण्याची शक्यता
व्यायामाचा अभाव, मैदानी खेळ न खेळणे, मोबाइलचा अतिवापर, खाण्या-पिण्याची वेळ निश्चित नसल्याने तसेच अयोग्य आहारामुळे मुलांचे वजन वाढले आहे. लठ्ठपणामुळे कमी वयात मुलांमध्ये अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
--------------------
ही घ्या काळजी
मुलांना फास्टफूड, जंकफूड देणे टाळावे. आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश असावा. मुलांकडून योग्य पद्धतीने व्यायाम करून घ्यावा. मैदानावर जाणे शक्य नसल्यास घरासमोर मोकळ्या जागेत त्यांच्यासोबत पालकांनी वेळ घालवावा; मात्र हे करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याचीही काळजी घ्यावी.
--------------
कोपरगाव येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अकरावी सीबीएससी पॅटर्नसाठी गतवर्षी वसतिगृहात राहिलो. तेथे माझे वजन ६५ किलो होते; मात्र आता आठ-दहा महिन्यांपासून घरी आहे. ना खेळणे, ना फिरणे त्यामुळे वजन ७३ किलो झाले आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे.
कपिल देशमुख, विद्यार्थी, कोतूळ, ता. अकोले.
---------------
मुलगा मोबाइलशिवाय जेवण करतच नाही, मोबाइल हातात असल्याने आपण काय जेवतो? किती जेवतो? याचेही भान त्याला नसते. मोबाइल हातातून घेतल्यानंतर तो रडतो, चिडतो. त्यामुळे त्याला मोबाइल देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. लवकरच शाळा सुरू कराव्यात, ऑनलाइन अभ्यासाचा काहीही उपयोग होत नाही.
वैभव विलासलाल भंडारी, आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर.
------------------