मदतीची भावना आली अंगलट; चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:29 IST2020-06-14T16:28:28+5:302020-06-14T16:29:41+5:30
ट्रकमधील डिझेल संपले म्हणून ते आणण्यासाठी ज्यांना मदत केली, नंतर त्यांनीच तरूणाला लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास नगर शहरातील नेप्ती नाका चौकात घडली.

मदतीची भावना आली अंगलट; चाकूच्या धाकाने तरुणाला लुटले
अहमदनगर : ट्रकमधील डिझेल संपले म्हणून ते आणण्यासाठी ज्यांना मदत केली, नंतर त्यांनीच तरूणाला लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास नगर शहरातील नेप्ती नाका चौकात घडली.
याबाबत राजेंद्र मदन राम (वय ३५, नेप्ती चौक, नालेगाव) यांनी फिर्याद दिली. राम हे शुक्रवारी नेप्ती चौकात उभे असताना ५ अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या.
‘आमच्या ट्रकमधील डिझेल संपले आहे, तुमच्या दुचाकीवर ते आणण्यासाठी मदत करा,’ असे या व्यक्तींनी राम यांना सांगितले. त्यावर राम त्यांनी त्यांना डिझेल आणण्यासाठी मदत केली. परंतु नंतर मात्र यातीलच एकाने राम यांच्या पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला व इतर चौघांनी राम यांच्याजवळील १० हजार रूपयांच्या कपड्याची बॅग, मोबाईल व १५ हजार रूपये रोख असा ऐवज काढून घेतला. तसेच दुचाकीचेही नुकसान केले.
त्यानंतर हे आरोपी ट्रकमधून (एमएच १६ एवाय ९६६५) कामरगावच्या दिशेने पळून गेले. याबाबत कोतवाली पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.