इच्छुकांचा गेम झाला! पक्षात प्रवेश करताच कोयटेंना राष्ट्रवादी काँग्रेसने दिली नगराध्यक्षपदाची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 20:00 IST2025-11-14T19:59:39+5:302025-11-14T20:00:35+5:30
भाजपने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेले नगरसेवकपदाचे उमेदवार जनार्दन कदम यांनीही अजित पवार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

इच्छुकांचा गेम झाला! पक्षात प्रवेश करताच कोयटेंना राष्ट्रवादी काँग्रेसने दिली नगराध्यक्षपदाची उमेदवारी
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गुरुवारी प्रवेश झाला. आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून कोपरगावच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यांचा प्रवेश व उमेदवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, सहकार क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काका कोयटे यांचे नाव आहे. नगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते, त्यांची तयारी देखील झाली होती. परंतु कोयटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकाही इच्छुकाने किंतु-परंतु न करता कोयटे यांच्या नावाला सहमती दर्शविली. नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या भरपूर आहे. सर्वांना संधी मिळेल. नगरसेवकपदाच्या उमेदवारांची घोषणा लवकरच करणार आहे.
काका कोयटे म्हणाले, मागील निवडणुकीतही आमदार काळे यांनी मला विचारणा केली होती. यंदा मात्र मी होकार दिला. मी कोपरगावचा नावलौकिक राज्यभर नेईल. माझ्या जोडीला तीस नगरसेवक निवडून द्या. यापुढे शहराचा सर्वांगीण विकास व बाजारपेठेची भरभराट हाच माझा ध्यास असेल.
भाजपने उमेदवारी जाहीर केलेले कदम पवार गटात
भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेले नगरसेवकपदाचे उमेदवार जनार्दन कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गुरुवारी सामील झाले आहेत.
भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यात प्रभाग क्रमांक तीनमधून कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी कदम यांनी कोल्हे यांची साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केला. माजी नगरसेवक जनार्दन कदम हे काका कोयटे यांचे समर्थक आहेत. कोयटे यांना राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने, त्यांच्या सोबतच कदमही राष्ट्रवादीत गेले आहेत.