देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान
By शेखर पानसरे | Updated: May 13, 2023 16:16 IST2023-05-13T16:08:30+5:302023-05-13T16:16:42+5:30
Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे.

देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान
- शेखर पानसरे
संगमनेर : कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात आणि राज्यात आता काँग्रेसच्या सरकारची गरज असून भाजपाची घसरण सुरू झाली. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शनिवारी (दि.१३) संगमनेरात जल्लोष करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा, एनएसयूआय तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, विश्वास मुर्तडक, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बालोडे आदी यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. २०१४ मध्ये भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून त्यामुळे समाजात समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिक अस्वस्थ आहेत. असेही आमदार थोरात म्हणाले.